रुग्णालयांतील आग प्रतिबंधक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूचा निषेध; नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने..

SHARE:

अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या पार्श्वभूमीवर नवजागरण मनिषीक्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून रुग्णालयांमधील आग प्रतिबंधकआपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेची तातडीने व्यापक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.

अमरावतीतील ही घटना केवळ एक अपघाती घटना म्हणून पाहता येणार नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही सरकारी तसेच रुग्णालयांशी संबंधित आरोग्य केंद्रांमध्ये आगीच्या दुर्घटना घडून रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे प्रत्येक दुर्घटनेनंतर काही दिवस चर्चा होऊन पुन्हा सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होण्याऐवजी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेबाबत कायमस्वरूपी आणि कठोर यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, अशी भूमिका समितीने मांडली.

महाराष्ट्रातील पूर्वीच्या गंभीर दुर्घटनांची पार्श्वभूमी
९ जानेवारी २०२१ — भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या Special Newborn Care Unit (SNCU) मध्ये लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी SNCU मध्ये १७ नवजात बालके दाखल होती.
२५ फेब्रुवारी २०११ — मुंबई, भांडुप : भांडुपमधील कोविड केअर सेंटरमध्ये लागलेल्या आगीत ९ रुग्णांचा मृत्यू झाला.
१० एप्रिल २०२१ — नागपूर : पश्चिम नागपुरातील वाडी भागातील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत किमान ४ रुग्णांचा मृत्यू झाला.
२३ एप्रिल २०२१ — विरार, पालघर : विजय वल्लभ रुग्णालयाच्या ICU मध्ये लागलेल्या आगीत १३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला.
२८ एप्रिल २०२१ — ठाणे, मुंब्रा : कौसा येथील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू झाला.
६ नोव्हेंबर २०२१ — अहिल्यानगर : अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड ICU मध्ये लागलेल्या आगीत १० रुग्णांचा मृत्यू झाला. या वॉर्डमध्ये १७ रुग्ण दाखल होते.
१८ डिसेंबर २०१८ — मुंबई, मारोल MIDC : राज्य सरकारच्या ESIC कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू आणि १४५ जण जखमी झाले होते. त्यापैकी २८ जण गंभीर जखमी झाले होते.

या घटनांची मालिका पाहता रुग्णालयांमधील फायर सेफ्टी, विद्युत सुरक्षा, फायर अलार्म, स्प्रिंकलर व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, ऑक्सिजन व वैद्यकीय उपकरणांची सुरक्षितता आणि कर्मचाऱ्यांचे आपत्कालीन प्रशिक्षण या सर्व बाबींचे गांभीर्याने परीक्षण करणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले.
देशभरातील घटनांमधूनही धडा घेण्याची गरज
महाराष्ट्राप्रमाणेच देशातील विविध भागांमध्येही रुग्णालयांमध्ये आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्णालयातील रुग्ण अनेकदा स्वतःहून सुरक्षित ठिकाणी जाऊ शकत नाहीत. ICU, NICU, SNCU आणि इतर अतिदक्षता विभागातील रुग्ण तर पूर्णपणे रुग्णालयीन यंत्रणेवर अवलंबून असतात. त्यामुळे रुग्णालयांची अग्निसुरक्षा ही केवळ प्रशासकीय औपचारिकता नसून रुग्णांच्या जीवनाशी संबंधित मूलभूत सुरक्षा व्यवस्था आहे, असे समितीने स्पष्ट केले.

समितीच्या प्रमुख मागण्या –
नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील मागण्या करण्यात आल्या :
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बालकांच्या मृत्यूची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. आगीचे नेमके कारण, अग्निसुरक्षा यंत्रणेची स्थिती आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेतील त्रुटींची तांत्रिक तपासणी करण्यात यावी. अमरावती जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व आरोग्य केंद्रांचे स्वतंत्र फायर सेफ्टी ऑडिट तातडीने करण्यात यावे.

रुग्णालयातील फायर अलार्म, स्प्रिंकलर, अग्निशमन यंत्रणा, विद्युत वायरिंग आणि आपत्कालीन निर्गमन मार्गांची नियमित तपासणी बंधनकारक करण्यात यावी.
ICU, NICU आणि SNCU सारख्या अतिसंवेदनशील विभागांसाठी विशेष अग्निसुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात यावा. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना नियमित अग्निशमन व आपत्कालीन बचाव प्रशिक्षण देण्यात यावे आणि मॉक ड्रिल घेण्यात यावी.

सुरक्षा व्यवस्थेतील निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत देऊन आवश्यक प्रशासकीय सहकार्य करण्यात यावे. रुग्णालयांच्या फायर सेफ्टी ऑडिटचा अहवाल व त्यावरील कार्यवाही जनतेसमोर पारदर्शकपणे जाहीर करण्यात यावी. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी कालबद्ध सुरक्षा सुधारणा आराखडा तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.

निदर्शनादरम्यान समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सवाल केला की, “दरवेळी रुग्णालयात आग लागल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था सक्षम का केली जात नाही?”
“रुग्णालय हे रुग्णांचे प्राण वाचविण्याचे ठिकाण आहे; तेथे सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे निष्पाप रुग्णांचा जीव जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे समितीने म्हटले. अमरावतीतील तीन नवजात बालकांच्या मृत्यूला केवळ दुर्दैवी घटना म्हणून न पाहता, या घटनेतून संपूर्ण सरकारी आरोग्य व्यवस्थेने धडा घ्यावा आणि “सुरक्षित रुग्णालय — सुरक्षित रुग्ण” या उद्देशाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीने केली.
प्रशासनाने मागण्यांवर तातडीने कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.

यावेळेस समितीचे सन्माननीय गणेश मुंधरे, सतीश ढोरे, धनंजय देशमुख, रुपेश वानखडे रुपाली खोडके, निलू दास, राहुल खोडके, अनिल पुराणिक, सागर जामुळकर, तेजस गोतरकर, तेजस्विनी सोनारे, प्रफुल कुयटे, सतीश वाघमारे, कांडलकर काका, मोसीन सौदागर, सोपान बोरकर, अब्दुल तौकिर उपस्थित होते.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment