कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सत्कार; डॉ. प्रमोद गारोडे साहित्याला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व – प्रा. अरुण बुंदेले

SHARE:

अमरावती : सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल व त्यांच्या कार्याला सतत प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या भार्या प्रा. डॉ. सौ. चित्रा गारोडे यांचा कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान, अमरावती तर्फे शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व प्रा. बुंदेले लिखित अभंग तरंग, निखारा, आदर्श अभ्यासाचे तंत्र, दारूनं मेला ओ माय ही पुस्तकं भेट देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले. समाजसेवक वऱ्हाडी कवी डॉ. राजा धर्माधिकारी यांनी कमलकुंज, गोवर्धन विहार, परतवाडा येथे त्यांच्या गृहालयी दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सत्कार केला.

      सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांनी अध्यक्षीय भाषणातून “प्रा. डॉ. प्रमोद भीमराव गारोडे सरांचे सात काव्यसंग्रह, बारा समीक्षाग्रंथ, पंचवीस  संपादित ग्रंथ व एक कथासंग्रह असे 45 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. असे साहित्याला स्वतःला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. प्रमोद गारोडे आहेत. ते बी. एस. पाटील महाविद्यालय, परतवाडा येथे प्राध्यापक असून मराठी विषयात नवनवीन उपक्रम प्रकल्पातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य सर आज करीत आहेत. ते पद्व्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख आहे. त्यांच्या ग्रंथांना डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल साहित्य पुरस्कार, कॅनडा तसेच मि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाच्या पुरस्कारांसह विविध प्रतिष्ठित साहित्यिक व सामाजिक संस्थांकडून ५६ साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, तसेच प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा “डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने” राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यापूर्वी सुद्धा त्यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई बेस्ट टीचर अवॉर्ड-२०१४, पुणे. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-२०१५, सायन्स फाउंडेशन, पुणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार-२०१५, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, अकोला. आदर्श शिक्षक पुरस्कार गौरवपत्र-२०१५, बुलडाणा असे त्यांच्या आदर्श अध्यापनाचा गौरव करणाऱ्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. विशेष म्हणजे अंकुर साहित्य संघ, अकोलाच्या वतीने साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय व भरीव कार्याबद्दल मा. नामदार डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते अंकुर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

     महाराष्ट्र शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सर सदस्य आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील खंडांचे संपादक आहेत. राज्य मराठी अभ्यास मंडळ, बालभारती, पुणेचे सर सदस्य आहेत. विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावर महाराष्ट्रभर आजपर्यंत सरांनी २०० च्या वर विविध ठिकाणी व्याख्यानातून व भाषणातून प्रबोधन केले आहे व करीत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित वक्ता पदावरून त्यांनी दिलेली भाषणे गाजलेली आहेत. असे साहित्य क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. प्रमोद गारोडे.

 

डॉ. प्रमोद गारोडे चतुरंग व्यक्तिमत्त्वाचे धनी
– राजा धर्माधिकारी

       सत्काराच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. राजा धर्माधिकारी म्हणाले की, “आज सुवर्णाशी सुगंधु असा सुंदर योग मला लाभला. प्रख्यात प्रोफेसर, बहुमुखी प्रतिभेचे धनी, प्रचंड संशोधनपर समाजपयोगी साहित्य संपदा निर्माण करणारे डॉ. प्रमोदराव गारोडे यांचा भावपूर्ण सपत्निक सत्कार करण्याचा व या मंगल प्रसंगाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. अत्यंत कमी वयात डॉ. प्रमोदजी गारोडेंनी निर्माण केलेली बहुविध ग्रंथ संपदा, शासन ते समाजातील विविध अध्ययन संस्थांतील त्यांचे प्रमुख  मार्गदर्शक अस्तित्व थक्क करणारे आहे. आज अशा चतुरंग विद्वत व्यक्तित्वाचा त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदान बद्दल साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांनी स्वतःच्या कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान द्वारे भावपूर्ण वातावरणात सत्कार केला, याचा मला खूप आनंद होत आहे. या उपक्रमाला मनापासून  शुभेच्छा! आणि सत्कार मूर्तीचे अभिनंदन!” असे विचार कवीवर्य राजा धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

आई-वडिलांच्या स्मृती जागृत ठेवणारे प्रा. बुंदेले यांचे कार्य
– प्रा. डॉ. प्रमोद गारोडे

     सत्कारमूर्ती प्रा. डॉ. प्रमोद गारोडे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, “कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे झालेल्या सत्कारामुळे मला नव्याने लेखन करण्याची ऊर्जा प्राप्त झाली. आईच्या नावाने स्थापन केलेल्या प्रतिष्ठान द्वारे प्रा. बुंदेले सरांनी माझ्या साहित्यिक कार्य कर्तृत्वाचा जो आज सन्मान केला त्यामुळे मी भारावून गेलो. आपण अतिशय सन्मानाने आम्हा नवराबायकोच्या अंगावर पांघरलेल्या शालीच्या प्रेमाची मायेची उब ही जन्मभर सोबत राहणार आहे. आई-वडिलांच्या स्मृती जागृत ठेवणारे प्रा. बुंदेले यांचे कार्य आहे. आपण केलेल्या सत्काराबद्दल मी सदैव आपल्या स्नेहात राहील.” असे विचार डॉ. गारोडे यांनी व्यक्त केले. 

      याप्रसंगी प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांनी स्वलिखित पुस्तके भेट देऊन प्रा. अरुण बुंदेले व वऱ्हाडी कवी डॉ. राजा धर्माधिकारी यांचा सन्मान केला. यावेळी अनेक साहित्यिक मित्रांनी प्रा. प्रमोद गारोडे सरांना सत्काराबद्दल ऑनलाइन अभिनंदन केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा