
वॉशिंग्टन : व्हाइट हाऊसच्या जवळ तीन दिवसांपूर्वीच नॅशनल गार्डच्या सदस्यांवर हल्ला झाला. त्यानंतर आता कॅलिफोर्नियात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर येत आहे. स्टॉकटन येथे एका वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात ४
जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत.
जोआकिन काउंटी शेरिफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत.
लहान मुलाचा वाढदिवस अन्…
रिपोर्टनुसार, हा गोळीबार एका लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाला. काही वेळापूर्वीच लहान मुले आणि त्यांचे कुटुंबीय तिथे जमले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते, तर आपत्कालीन सेवा देणारे कर्मचारी जखमींना मदत करण्यासाठी धावत होते. हल्लेखोर अजूनही फरार असून पोलीस आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेत आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
या गोळीबारात अनेक मुले जखमी झाली आहेत. ९ आणि १२ वर्षांच्या मुलांना, २३ वर्षांचा एक तरुणाला आणि इतर काही प्रौढ व्यक्तींना गोळ्या लागल्या आहेत. एकूण १९ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी ४ जणांच्या मृत्यूबद्दल दुजोरा दिला आहे, परंतु अशीही भीती व्यक्त केली जात आहे की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काही जखमी मुलांना सीपीआर (CPR) दिला जात असून त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून करण्यात येत आहे. ज्यात परिसरात पोलिसांच्या गाड्या दिसत असून अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी दिसत आहेत.अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना घटनेबद्दल माहिती दिली, ते म्हणाले की, संशयित आरोपी फरार आहे. हा हल्ला लक्ष्य निश्चित करून केला प्राथमिक संकेतानुसार निदर्शनास येत आहे.





