
नवी दिल्ली – दिल्लीतील एमसीडी पोटनिवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टीला (AAP) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दिल्लीचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते आणि कर्नाटक प्रभारी म्हणून काम करणारे राजेश गुप्ता यांनी पक्षाचा राजीनामा देत शनिवारी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या निर्णयाने ‘आप’ च्या अंतर्गत वातावरणावर आणि आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होणार असल्याचं मानलं जात आहे.
भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात गुप्ता यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत करताना ‘आप’ वर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, AAP ची अंतर्गत आपत्ती आता भाजपासाठी संधी ठरणार आहे.”
राजेश गुप्ता यांनी भाजपात प्रवेश करताना ‘आप’ नेतृत्वावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितलं की, “पार्टी माझ्यापासून दुरावली, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची दखल घेणंही थांबवलं. अरविंद केजरीवाल माझे फोन उचलत नाहीत, सौरभ भारद्वाजही संवाद साधत नाहीत. दहा वर्षांची माझी मेहनत एका क्षणात विसरली गेली.” पत्रकार परिषदेदरम्यान ते भावुक होऊन रडू लागले.
गुप्ता यांनी स्पष्ट केले की, AAP आता मूळ विचारधारेपासून भटकली आहे. “स्वच्छता, पारदर्शकता आणि स्वच्छ राजकारण”, या वचनांवर उभारलेला पक्ष आज भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला असून त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. त्यांच्या मते, AAP मध्ये सध्या तत्त्वांना स्थान नसून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले जात आहे. हे पाहून त्यांना तीव्र निराशा झाली आहे.
भाजपमध्ये प्रवेशानंतर गुप्ता यांनी विश्वास व्यक्त केला की ते आता दिल्लीच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकतील. त्यांनी भाजपच्या राष्ट्रवादाच्या भूमिकेचे आणि विकासाभिमुख धोरणांचे कौतुक करत, पक्षासोबत नवी राजकीय वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भाजप नेत्यांनी गुप्ता यांच्या प्रवेशाला मोठे महत्त्व दिले असून, आप मधील असंतोष आता भाजपाची ताकद वाढवेल, असा दावा त्यांनी केला. दिल्लीतील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळे ‘आप’ला निश्चितच धक्का बसल्याचे राजकीय तज्ञ मानत आहेत.
राजेश गुप्ता यांचा भाजप प्रवेश हा एमसीडी पोटनिवडणुकांच्या तोंडावर ‘आप’साठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी, नेतृत्वावरचे आरोप यामुळे ‘आप’ साठी नवीन संकट उभं राहिलं आहे. या घडामोडींचा निवडणुकीवर किती परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.





