स्पा सेंटरमध्ये महिलांना जबरदस्ती देहविक्रीच्या दलदलीत ढकललं, नवी मुंबई पोलिसांना खबर अन् खेळ खल्लास, ६ महिलांची सुटका…

SHARE:

नवी मुंबई : नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने वाशीत सिनेस्टाईल कारवाई केली आहे. वाशीत एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाने भलतेच प्रकार सुरु होते. या कृत्याची खबर पोलिसांना लागली होती. पोलिसांनी या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी योग्य प्लॅन आखत सापळा रचला. पोलिसांनी या स्पा सेंटरमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला. त्याने स्पा सेंटरमध्ये खातरजमा केली आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने स्पा सेंटरवर धाड टाकत आरोपींच्या रंगेहात मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांना मोठं यश आलं आहे. पण तरीही एक आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई गुन्हे शाखेने मसाजच्या आडून वेश्या व्यवसाय करणाऱ्या आरोपींविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने वाशी सेक्टर ११ येथील आरपणाच सलून अँड स्पा येथे छापा टाकून सहा महिलांची सुटका केली. महिलांना जबरदस्तीने देहव्यापारास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला होता.

छाप्यामध्ये स्पाची मॅनेजर असिमा रॉबिन घोष (वय ३४ ) हिला पोलिसांनी रंगेहात अटक केली. तर तिचा पार्टनर नर आलम शेख हा फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. या दोघांनी संगनमत करून महिलांना मसाज पार्लरमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले आणि नंतर त्यांच्याकडून ६०००  रुपये घेऊन देहव्यापार करवून घेत होते. बनावट ग्राहकाला महिलांना उपलब्ध करून देत असताना आणि व्यवहार स्वीकारताना पोलिसांनी असिमा घोषला पकडले.

या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६२७/२०२५  भा.न्या.सं. कलम १४३(३ ), ३ (५ ) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६  चे कलम ३,४ ,५ ,७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीला ४ डिसेंबर २०२५  पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार वपोनि पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा