
पालघर – पालघरमध्ये मासेमारीसाठी अवैध स्फोटकांची विक्री जोरात चालू आहे, तर अवैध वस्तूंच्या वापराने नागरिकांच्या जीवाला धोका आहे. मोखाड्यात अवैध स्फोटकांची विक्री तेजीत चालली आहे. मोखाड्यात गेले काही महिने स्फोटकांची विक्री बंद झाली होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा स्फोटकांची विक्री होत असून नागरिक मासेमारी करण्यासाठी या भूसुरुंग स्फोटकांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहेत.
यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत किंवा गंभीर दुखापती होत आहेत. परंतु अशी जीवघेणी स्फोटके काही खेड्यात सर्रासपणे विक्री केली जात आहेत. ही विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ग्रामीण भागात मासेमारी करताना सुरक्षित जाळयांचा किंवा कायदेशीर पद्धतींचा वापर करण्याऐवजी, काही लोक धोकादायक आणि स्फोटकांसारख्या अवैध वस्तूंचा वापर करत आहेत. या पद्धतीमुळे जास्त मासे मिळतील अशी त्यांची अपेक्षा असते, पण यात मासेमारी करणारे व परिसरातील नागरिकांच्या जीवाला ही प्रचंड धोका आहे.
अशा धोकादायक पद्धती वापरताना अनेक अपघात घडले आहेत. स्फोटकांचा अयोग्य वापर केल्याने अनेकांनी आपले हात गमावले आहेत, तर काही तरुणांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. या घटना मोठया प्रमाणात घडत असूनही, काही ठिकाणी ही धोकादायक पद्धत अजूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांच्या मते, या धोकादायक पद्धतींचा वापर आणि काही ठिकाणी अवैध वस्तूंची विक्री होत आहे. तरीही ही माहिती असूनही प्रशासनाकडून पुरेशी कारवाई होत नाही. प्रशासनाकडून अशा अवैध कामांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
पाण्यात सुरक्षित मासेमारीचे महत्त्व आहे. तर मासेमारी हा उदरनिर्वाहाचा एक मार्ग असू शकतो, पण तो सुरक्षित आणि कायदेशीर मार्गानेच व्हायला हवा. केवळ जास्त फायद्यासाठी किंवा माशांच्या हव्यासापोटी आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालणे अत्यंत चुकीचे आहे. पालघर जिल्हा किंवा राज्यातील समुद्रकिनारी भागात संबंधित प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, अवैध पद्धतींवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा दुर्घटना थांबतील आणि लोकांचे जीव वाचतील. राज्याच्या समुद्रकिनारी भागात आलजही मासेमारीसाठी धोकादायक पध्दतीचा वापर केल्यामूळे, अनेक लोकांचे जीव गेले आहेत, यांवर प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे, असे पालघर जिल्हयातील व मोखाडा परिसरातील काही मासेमारी करणारे लोक आणि स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.





