
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. सोलापुरात महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना प्रदेश पातळीवरून सोलापूर महानगरपालिकेच्या २० उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. काँग्रेसच्या महिला नेत्या फिरदोस पटेल यांचं काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव होतं. प्रभाग १६१६ मधून काँग्रेस फिरदोस पटेल, सीमा यलगुलवार, नर्सिंग कोळी अशा तीन उमेदवारांची नावे होती. फिरदोस पटेल या खासदार प्रणिती शिंदेंच्या अत्यंत विश्वासू नेत्या मानल्या जातात. पण त्यांनी रविवारी २८ डिसेंबर रोजी एमआयएमच्या वरीष्ठ नेत्यांना भेटून प्रभाग 16 मधून उमेदवारी मागितली.
प्रभाग १६ हा मुस्लिम बहुसंख्याक असलेला प्रभाग असल्याने फिरदोस पटेल यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झाले आहे. फिरदोस पटेल या महिला नेत्याने प्रतिक्रिया देताना, नाराजी व्यक्त केली. सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. संशयाच्या नजरेने पाहिले जात होते. त्यामुळे काँग्रेस सोडून जाण्याचा आणि एमआयएमकडून निवडणूक लढवण्याचा ठरवलं, अशी प्रतिक्रिया फिरदोस पटेल यांनी दिली आहे.
फिरदोस पटेल प्रणिती शिंदेंच्या विश्वासू, तरीही…
फिरदोस पटेल या काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार प्रणिती शिंदे ज्यावेळी आमदारकीच्या निवडणुकीत होत्या, त्यावेळी फिरदोस पटेल आणि त्यांच्या समर्थकांनी प्रणिती शिंदेंसाठी विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील फिरदोस पटेल यांनी खासदार प्रणिती शिंदेंसाठी अहोरात्र मेहनत घेतली.
विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलत गेले. फिरदोस पटेल यांचे जवळचे नातेवाईक शौकत पठाण यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. तेव्हा पासून फिरदोस पटेल यांच्यावर काँग्रेस पक्षात संशयाच्या नजरेने पाहिले जात होते. त्यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेंच्या खास आणि विश्वासू फिरदोस पटेल यांनी दिली आहे. दरम्यान, फिरदोस पटेल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता प्रभाग 16 मध्ये काँग्रेसचा विजय होतो की एमआयएमचा विजय होतो? याबाबत उत्सुकता वाढली आहे.





