पुणे – भाजपने गेल्या महापालिका निवडणूकीत पुणेकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला. मात्र, ती आश्वासने आणि घोषणा हवेत विरल्या. भाजपने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करणार्या ‘फेकनामा भाजपचा’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले कि फेकनामा या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालया हवा. फेकाफेकी करून सत्तेत येणार्या मोदी-फडणवीस यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.
सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतात आणि सत्तेत बसवतात. सत्तेत बसवलेले अजित पवार हे ज्वलंत उदाहरण आहे, अजित पवार यांच्यावर भाजपने ७० हजार कोटींचा आरोप केला आणि नंतर तेच उपमुख्यमंत्री झाले. व्हाइट पेपर काढलं देशातलं तर सगळ्यात मोठा घोटाळा अशोक चव्हाणांनी केला ते आज भाजपमध्ये गेलेत, असे राऊत म्हणाले.
मुंबई तोडता येणार नाही म्हणून शिवसेना फोडली. अमित शाहांनी मुंबई लुटली आहे. अमित शाह यांच्या कंपनीला एकनाथ शिंदेनी पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. शिवसेना हे चिन्ह आपल्याला परत द्यावे लागणार आहे. ज्यादिवशी हे चिन्ह एकनाथ शिंदीकडून जाईल तेव्हा भाजप एकनाथ शिंदे यांना लाथा घालून बाहेर काढेल अशी टीका देखील संजय राऊतांनी केली.
सत्ताधारी भाजपला सत्तेचा माज आला असून लोकसभा ते ग्रामपंचायतीपर्यंत त्यांनी आपली सत्ता हवी आहे. विरोधकांना एकही जागा मिळू न देण्याची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. मात्र, लोकशाही आणि महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का? असा सवाल करीत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूतील भाजपचा नेता अण्णामलाई मुंबईत आला आणि ‘मुंबई महाराष्ट्राची नाही, असे म्हणून गेला. तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिंदे हे गप्प बसले. अशाप्रकारे बोलणार्यांवर सरकार गप्प का आहे? असा सवाल त्यांनी केला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि मराठी माणसाची आहे. 106 लोकांनी बलिदान दिलं आहे. ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि केंद्रशासीत प्रदेश करायचा आहे, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.
महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार गुजरातला पळविले जात आहे. मुंबई देशाची अर्थिक राजधानी आहे. म्हणून त्याला आंतराष्ट्रीय महत्व आहे. पण मुंबईवर सर्वात पहीला हक्क मराठी माणासाचा आहे. मुंबई तोडण्यापेक्षा मुंबईसारखी शहरे बिहार, गुजरातमध्ये तुम्ही निर्माण करा, असा सल्ला त्यांनी सत्ताधार्यांना दिला. नाशिक येथे होणार्या कुंभमेळ्यासाठी तब्बल 50 हजार कोटींचे टेंडर काढले आहे. यातील सर्व ठेके गुजराती लोकांना दिले.मग महाराष्ट्रातील लोकांनी काय करायचे, असा सवाल संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपला केला.





