नवी दिल्ली – २०१४ ते २०२४ दरम्यान लोकसभेचा पुन्हा निवडून आलेल्या १०२ खासदारांची सरासरी संपत्तीत ११० टक्क्यांनी वाढली आहे. एडीआरच्या अहवालात हा खुलासा झाला आहे. अहवालानुसार या खासदारांची सरासरी संपत्ती २०१४ मध्ये १५.७६ कोटी होती, जी २०२४ मध्ये वाढून ३३.१३ कोटी झाली. म्हणजे एक प्रकारे या खासदारांची संपत्ती १० वर्षात दुपटीने वाढली आहे. यात भाजप खासदार उदयनराजे भोसले आघाडीवर आहेत.
अहवालानुसार सर्वाधिक वाढ ही झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांच्या संपत्तीत नोंदवली गेली. दुसऱ्या स्थानावर एआयएमआयएमचे खासदार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बिहारमधील जेडीयू पक्षाचे खासदार आहेत. महाराष्ट्रातील साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ६० कोटी रुपये होती, जी २०२४ मध्ये वाढून २२३ कोटी रुपये झाली. म्हणजेच १० वर्षांत त्यांच्या संपत्तीत २६८ टक्के वाढ झाली.
अहवालानुसार, झामुमो खासदारांच्या संपत्तीत ८०४ टक्के वाढ झाली. एआयएमआयएम खासदारांच्या संपत्तीत ४८८ टक्के वाढ नोंदवली गेली. बिहारमधील सत्तारूढ जनता दल युनायटेडचे खासदारांच्या सरासरी संपत्ती गेल्या दहा वर्षांत २५९ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातच्या जामनगरच्या भाजप खासदार पूनमबेन माडम यांची संपत्ती २०१४ मध्ये १७ कोटी रुपये होती. गेल्या दहा वर्षांत हा आकडा १४७ कोटी रुपये झाला आहे. त्यांच्या संपत्तीत ७४७ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
तसेच, मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांची संपत्ती २०१४ मध्ये १७८ कोटी होती. जी वाढून २०२४ मध्ये २७८ कोटी झाली. तृणमूलचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती २०१४ मध्ये १३१ कोटी होती, जी २०२४ मध्ये वाढून २१० कोटी झाली. म्हणजेच त्यांच्या संपत्ती ७८ कोटी रुपयांची वाढ झाली.
ही आकडेवारी सूचित करते की राजकीय पद हे असामान्य आर्थिक लाभाचा मार्ग बनले आहे, जो अनेकदा सामान्य नागरिकांच्या आर्थिक वास्तवापासून पूर्णपणे वेगळा असतो. देशात आर्थिक असमानता हा एक गंभीर राष्ट्रीय प्रश्न असताना, खासदारांच्या मालमत्तेतील वाढ लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वास कमी करण्याचा धोका निर्माण करते, असा निष्कर्ष एडीआरने काढला आहे.





