ना रुग्णवाहिका मिळाली ना मदत, वडिलांकडून रस्त्याच्या कडेला नवजात मुलीवर अंत्यसंस्कार

SHARE:

भोपाल – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना एका फोन कॉलवर रूग्णवाहिका मिळेल असा दावा केला होता. मात्र त्यांचा हा दावा राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि सध्याही फोल ठरत आहे कारण कि एका वडिलांना रस्त्याच्या कडेलाच आपल्या नवजात मुलीवर अंत्यसंस्कार करावे लागले. रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यास कोणीही मदत केली नाही. मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील भैरुंडा येथे ही घटना घडली.या घटनेने सरकारी आरोग्यसेवेच्या स्थितीचा पर्दाफाश केला आहे.

भैरुधा येथील रहिवासी संतोष जाट यांनी त्यांच्या गर्भवती पत्नी ममताला मोठ्या अपेक्षेने रुग्णालयात दाखल केले. ३० डिसेंबर रोजी भैरुधाहून रेफर केल्यानंतर, ममताने २  जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. मात्र ४८ तासाच्या आतच बाळ दगावले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या घोर निष्काळजीपणामुळे आणि उपचारांच्या अभावामुळे त्यांच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप संतोष यांनी केला आहे.
शोकाकुल वडिलांचे म्हणणे आहे की जर त्यांना वेळेवर डॉक्टर आणि जीवनरक्षक उपकरणे मिळाली असती तर आज त्यांचे बाळ जिवंत असते. विडंबना अशी कि मुलीच्या मृत्यूनंतर, असहाय्य वडिलांना तिचा मृतदेह गावी नेण्यासाठी योग्य साधनही मिळाले नाही. यामुळे यंत्रणेच्या असंवेदनशीलतेचा सर्वात भयानक चेहरा उघडकीस आला.

साधनसंपत्तीचा अभाव आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे व्यथित झालेल्या वडिलांना भैरुधा-सिहोर रस्त्यावरील इच्छावरजवळ रस्त्याच्या कडेला आपल्या लाडक्या मुलीवर अंत्यसंस्कार करावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.

दुसरीकडे, जिल्हा रुग्णालयाने संतोष यांचा आरोप फेटाळला आहे. रूग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. यू.के. श्रीवास्तव यांच्या मते, बाळ अकाली जन्मले होते आणि त्याचे वजन फक्त ९०० ग्रॅम होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे कि बाळाला एसएनसीयूमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, परंतु प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की त्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती, परंतु कुटुंब स्वतःहून निघून गेले. मात्र, कुटुंबाचा गोंधळ आणि कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी लक्षात घेता डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

याच महिन्यात काही दिवासापूर्वी रूग्णवाहिका न मिळण्याची घटना समोर आली. मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एका महिलेला चालत्या बसमध्ये प्रसूती करावी लागली. वेळेवर रुग्णवाहिका न आल्यामुळे गर्भवती महिलेला प्रवासी बसमध्येच बाळंतपण करावे लागले. जिल्ह्याच्या चंद्रनगर भागातून छतरपूर जिल्हा रुग्णालयात नेले जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे देखिल सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा