‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ : स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ अल्पावधीतच महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. समाजसुधारणेचा धगधगता इतिहास उलगडणारी ही मालिका केवळ कथा किंवा भव्य मांडणीमुळेच नव्हे, तर त्यातील प्रभावी व्यक्तिरेखांमुळेही चर्चेत आहे. विशेषतः मालिकेतील लहानग्या सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी बालकलाकार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
छोट्या सावित्रीच्या प्रत्येक दृश्यातून तिचा ठाम निर्धार, आत्मविश्वास आणि शिक्षणाविषयीची तीव्र ओढ ठळकपणे दिसून येते. अन्यायाविरोधात न घाबरता उभं राहणं, प्रश्न विचारण्याचं धाडस आणि समाजासाठी काहीतरी करण्याची सुप्त जिद्द या सगळ्या गुणांचा प्रत्यय तिच्या अभिनयातून सातत्याने येतो. सावित्रीबाईंच्या बालपणातील संघर्ष, स्वप्नं आणि विचार यांचं चित्रण इतकं प्रभावी आहे की प्रेक्षक नकळत त्या प्रवासाशी जोडले जात आहेत.
ही भूमिका साकारणारी गुणी बालकलाकार तक्षा शेट्टी हिने आपल्या सहज, नैसर्गिक अभिनयाने सावित्रीबाईंचं बालपण अतिशय प्रामाणिकपणे साकारलं आहे. तिच्या निरागस डोळ्यांत दिसणारी जिज्ञासा, अन्यायाविरोधातील अस्वस्थता, शिक्षणासाठीची आतून येणारी ओढ आणि मोठी स्वप्नं पाहण्याचं धैर्य या सगळ्यांतून भविष्यातील समाजक्रांतीची चाहूल मिळते, असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान, मालिकेत प्रौढ सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले हेदेखील छोट्या सावित्रीच्या अभिनयाने भारावून गेल्या आहेत. तक्षाचं मनापासून कौतुक करताना मधुराणी म्हणाल्या, “छोट्या सावित्रीमध्ये सावित्रीबाईंसाठी लागणारी ऊर्जा तक्षाने अगदी सहज पकडली आहे. तिला पाहताना माझ्याच बालपणाशी भेट झाल्यासारखं वाटतं. इतक्या लहान वयात तिची मेहनत, शिस्त, तयारी आणि प्रत्येक सीनबद्दलची तळमळ खरंच प्रेरणादायी आहे. ती केवळ भूमिका साकारत नाही, तर ती ती भूमिका जगते.”
प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमामुळे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका दिवसेंदिवस अधिक मजबूत होताना दिसत आहे. ही प्रेरणादायी कथा दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर नक्की पाहायला विसरू नका.





