आधी शोध; मग मैत्री, प्रेम, नंतर शरीरसुख…; १५ महिलांना संपवलं? रशियन आरोपीचे पोलीस तपासात चक्रवून टाकणारे दावे, घटनेनं गोवा हादरला!

SHARE:

गोवा : गोव्यामध्ये दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने पोलिसांच्या चौकशीमध्ये गंभीर दावे केल्याने या घटनेला वेगळं वळण लागलं आहे. मोरजी व हरमल येथे रशियन महिलांच्या निर्घृण खून प्रकरणामुळे गोव्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील संशयित रशियन किलर आलेक्सेई लिओनोव याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याची चौकशी सुरू असताना त्याने आणखी १५ महिलांना ‘मोक्ष’ दिला असल्याचा दावा केल्यामुळे पोलिसांनी आपली तपास अधिक गतिमान केला असून गोव्यात दोन रशियन महिलांच्या हत्येनंतर किनारपट्टीवरील राज्यातील पोलिस आरोपींनी इतरांचीही हत्या केली आहे का याचा शोध घेत आहेत. तर खून करणारा आरोपी आलेक्सेई हा पैशांसाठीच रशियन महिलांशी मैत्री करायचा. नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्या दुसऱ्यांच्या संपर्कात गेला की त्यांना खून करायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रशियन महिलांना हेरायचा;प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी संबंध..
या प्रकरणातील आरोपी आलेक्सेई हा पैशांच्या लालसेपोटी खून करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तो विशेषतः रशियन महिलांना लक्ष्य करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. प्रेमाचे आमिष दाखवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित करायचा आणि नंतर चलाखीने त्यांच्याकडून पैसे उकळायचा.

दरम्यान, संबंधित महिला अन्य व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समजताच आरोपी संशय आणि रागातून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत तो संबंधित महिलेचा खून करत असल्याचा गंभीर आरोप तपासात पुढे आला असून, या घटनांनंतर आरोपीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रशियन किलर आलेक्सेई याने आतापर्यंत १५ खून केल्याचा दावा केल्याने तपास यंत्रणा हादरून गेली आहे. कोठडीत चौकशीदरम्यान संशयिताकडून वारंवार विधाने बदलली जात असल्याने या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे. आरोपीच्या दाव्यांची शहानिशा करताना पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने तपासाची दिशा ठरवत किनारी भागात झाडाझडती मोहीम सुरू केली आहे. रशियन नागरिक वास्तव्यास असलेल्या खोल्यांची तपासणी करण्यात येत असून, आलेक्सेई नेमका कुठे वास्तव्यास होता, याचाही शोध घेतला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी दिवसरात्र विविध भागांत तपास मोहीम राबवली असून, या प्रकरणाचा धागा शोधण्यासाठी हिमाचल प्रदेश पोलिसांशीही संपर्क साधण्यात आल्याची माहिती आहे.

त्याने १५ महिलांचे खून केल्याचा दावा केला अन्…
पेडणे तालुक्यातील बामनभाटी–हरमल येथे एलिना (वय ३५) या महिलेचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच मोरजी येथे आणखी एका खुनाने खळबळ उडाली. मोरजी येथील एका घराच्या बाथरूममध्ये ३७ वर्षीय रशियन महिला एलिना वानिवा हिचा नग्न अवस्थेत गळा चिरून खून झाल्याचे आढळून आले. या दोन्ही घटनांमुळे उत्तर गोव्यात एकच खळबळ माजली आहे.

मांद्रे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आलेक्सेई याला शिताफीने ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने हे दोन्ही खून आपणच केल्याची कबुली दिली आहे. एवढेच नव्हे, तर गोवा आणि हिमाचल प्रदेशात मिळून तब्बल १५ महिलांचे खून केल्याचा धक्कादायक दावा त्याने केला असून, त्यामुळे पोलिस तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.

या संदर्भात मांद्रेचे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी सांगितले की, सध्या केवळ दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र संशयिताकडून मिळणारी कबुली पूर्ण आणि सुसंगत नसल्याने सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीने आणखी खून केल्याचा दावा केल्यामुळे पोलिस सर्व शक्यता गृहीत धरून तपास करत असून, इतर राज्यांतील पोलिसांशीही समन्वय साधला जात आहे.

Leave a Comment

अधिक वाचा