भाजप आमदार अरविंद पांडे यांचे भाऊ आणि पुतण्यांविरुद्ध गुन्हा दाखल, जमीन हडपण्याचा आरोप

SHARE:

रुद्रपूर – उत्तराखंड सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान भाजप आमदार अरविंद पांडे यांचे भाऊ आणि पुतण्यांविरुद्ध उधमसिंग नगर जिल्ह्यातील बाजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार आणि त्यांच्या कुटुंबियावर जमीन हडपण्याचा आरोप आहे. याबाबत संजय कुमार बन्सल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

मीडिया रिपोर्टनुसार, बन्सल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्यांनी आरोप केला आहे की आरोपींनी बनावट भाडे करार करून त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आणि जर त्यांनी प्रतिकार केला तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एफआयआरमध्ये आमदार पांडे यांचे मेहुणे जेपी तिवारी आणि त्यांचे भाऊ देवानंद पांडे, मोहन पांडे आणि किशन पांडे यांची नावे आहेत.
बन्सल यांच्या अनुसार, मुंडिया पिस्तोर गावात त्यांची जमीन आहे, जी त्यांनी आमदारांचे नातेवाईक जेपी तिवारी यांना भाड्याने दिली होती. २१ ऑगस्ट रोजी जिल्हा विकास प्राधिकरणाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि कथित बेकायदेशीर बांधकामासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आणि तात्काळ पाडण्याचे आदेश दिले.

त्यांनी आरोप केला की जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा पांडे यांच्या भावाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि जमीन त्यांची असल्याचे सांगत परत आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. बन्सल यांनी पुढे आरोप केला की त्यांच्या मालमत्तेचा फसवणूक करून ताबा घेण्यासाठी बनावट भाडे करार तयार करण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक एसके सिंह म्हणाले की फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

हे प्रकरण अशा वेळी समोर आले जेव्हा आमदार अरविंद पांडे यांची राजकीय प्रतिमा आधीच अनेक वादांमुळे मलिन झाली आहे. जमिनीच्या वादांबाबत त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही तक्रारी दाखल झाल्या आहेत. १४ जानेवारी रोजी बाजपूरमधील बिचपुरी गावातील परमजीत कौर यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये त्यांनी आरोप केला आहे की त्यांना अडीच एकर जमिनीसाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले, त्यांना ती फक्त एक एकर असल्याचे सांगितले गेले होते. व्हिडिओमध्ये त्यांनी अरविंद पांडे यांच्याकडून धमक्या येत असल्याचा आरोप करून संरक्षणाची विनंती केली होती.

अरविंद पांडे भाजपचे ज्येष्ठ राजकारणी आणि उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील गदरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घकाळ संबंध राहिला आहे. अरविंद पांडे यांची राजकीय कारकीर्द वादात राहिली आहे. तर अलिकडेच, त्यांची काही वक्तव्ये चर्चेत राहिली आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!