नाशिक – जिल्ह्यात सरपंच पती-पत्नीला १५ हजाराची लाच घेताना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात सरपंचाने एका व्यक्तीला ५० हजाराची लाच मागितली होती. एका नागरिकाने ५० हजारांची डिमांड असताना १५ हजार देण्याचे कबूल केले होते. नाशिकमधील सरपंच पती-पत्नीला १५ हजार स्वीकारताना एसीबीने पकडले आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कडक कारवाई केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील रासेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मंदा बेंडकुळे आणि त्यांचे पती विट्ठल बेंडकुळे यांना लाच स्वीकारताना अटक केली आहे. उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यात १५ हजार रुपये लाच स्वीकारताना ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, रासेगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच विशाल वारुळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.
हा ठराव नामंजूर करून देण्यासाठी सरपंच मंदा बेंडकुळे आणि त्यांचे पती विट्ठल बेंडकुळे यांनी विशाल वारुळे यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार विशाल वारुळे यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मी जनतेतून निवडून आलेला उपसरपंच असून यापूर्वी एकही रुपया न देता पद मिळवले आहे. मात्र अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी माझ्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मी नकार दिल्यानंतर ते १५ हजार रुपयांवर तयार झाले.
याबाबतचे सर्व पुरावे गोळा करून मी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती, असे तक्रारदार विशाल वारुळे यांनी सांगितले आहे. तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचला होता. एसीबीच्या योजनेनुसार, तक्रारदाराने सरपंच आणि त्यांच्या पतीला १५ हजार रुपये दिले असता एसीबीच्या पथकाने सरपंच पती-पत्नी दोघांनाही पकडले आहे. अटक केल्यानंतर दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात आता गावपातळीपर्यत लाच प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे.
आता राज्यातील ग्रामपंचायतीत ही भ्रष्टाचार वाढला आहे. नाशिक जिल्ह्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातच हा भ्रष्टाचाराचा प्रकार घडला आहे. नाशिक जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या गावपातळीवर लाच घेण्याच्या प्रकरणावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाच प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी दिंडोरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी केली आहे. या प्रकरणात अधिक तपास एसीबी करत आहे.





