११२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी भाजपच्या माजी मंत्र्याला अटक; राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ

SHARE:

सातारा – जिल्ह्यातील कराडच्या यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेच्या ११२ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे माजी मंत्री आणि राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना बुधवारी अटक केली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांची २  मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यशवंत को-ऑप. बँक लि. कराड या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ५  अधिकारी, संचालक मंडळ आणि तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे ९  नातेवाईक, अशा ५० जणांनी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी बँकेच्या ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रूपयांचा अपहार केला असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले होते. त्यावरून बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड शाखेतील कर्ज विभागाचे शाखा व्यवस्थापक आणि शेखर चरेगावकरांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने चरेगावकर यांच्या निवासस्थानी तसेच यशवंत बँकेच्या फलटण शाखेवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली होती. या छापेमारीदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ईडीकडून मनी लॉन्डरिंगच्या अनुषंगाने स्वतंत्र तपासही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

याआधीच चरेगावकर यांचा दत्तक भाऊ विठ्ठल कुलकर्णी याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडूनही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणातील पैशांचा प्रवाह, संबंधित कंपन्या, मालमत्ता व्यवहार आणि लाभार्थी यांचा सखोल तपास करत आहे. काही मालमत्ता गोठवण्याची कारवाईही लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अनेक ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराची बचत बँकेत ठेवली होती. त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर सत्य बाहेर यावे आणि जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील सहकारी बँकिंग व्यवस्थेवर या प्रकरणाचा परिणाम झाल्याचेही जाणवू लागले आहे.
चरेगावकर यांनी राज्यमंत्री दर्जाचे पद भूषवले होते. ते चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. या प्रकरणात ते बर्याच दिवासांपासून फरार होते आणि त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराड तालुक्यातील विंग गावात छापा टाकत चरेगावकर यांना अटक केली. या अटकेमुळे साताऱ्यातील तसेच राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा