पूणे – केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकार आल्यानंतर गोरक्षकांचा आतंक वाढला आहे. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये गुरांची वाहतूक करताना मुस्लिमांना मारहाण करण्यात आली किंवा त्यांची हत्या देखील करण्यात आली. आता अशीच एक घटना पूणे जिल्हयातून समोर आली आहे. पुणे शहरातील एका ट्रक चालकाला म्हशींची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला शेण खाण्यास भाग पाडल्याच्या आरोपात रविवारी चार स्वयंघोषित गोरक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, स्वयंघोषित गोरक्षकांच्या एका गटाने 6 मार्च रोजी ट्रक चालकाला म्हशींनी भरलेल्या ट्रकसह आंबेगाव पोलिस ठाण्यात आणले. पडताळणीनंतर पोलिसांनी म्हशींची बेकायदेशीर वाहतूक केल्याच्या आरोपाखाली प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या शिवाय, ट्रक चालकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी स्वयंघोषित गोरक्षकांविरुद्ध त्याच्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
दरम्यान, रविवारी, पोलिसांना एक व्हिडिओ मिळाला ज्यामध्ये कथित गोरक्षक ट्रक चालकाच्या धर्माबद्दल अपमानास्पद टिप्पणी करताना, त्याला मारहाण करताना आणि त्याला शेण खाण्यास भाग पाडताना दिसत आहेत.
पोलिसांनी मते, ट्रक चालकाने आपल्या तक्रारीत याचा उल्लेख केलेला नाही. मात्र, त्यांनी आता चौघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १९६, २९९, ३५२, ११५ (२) आणि ३ (५ ) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.
एआयएमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी एक्सवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आणि महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी एक्स वर लिहिले आहे की हिंदुत्ववादी गुंड एका मुस्लिम तरुणाला जबरदस्तीने गायीचे शेण खाऊ घालत आहेत, त्याला मारहाण करत आहेत आणि शिवीगाळ करत आहेत. असे दिसते की त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची भीती नाही. सरकारने त्यांना मोकळीक दिली आहे का? आम्ही महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी या गुंडांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करतो.





