मुंबई – विमानतळावर तस्करी प्रकरणात ६ जणांवर कडक कारवाई करण्यात आली आहे, तर याप्रकरणात ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई विमानतळावर ही घटना घडली आहे. तर मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ४ प्रवाशांची बॅग चेक केली आहे. मुंबई विमानतळावर तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत डॉलर्स, पाउंड स्टर्लिंग आणि हिरे असा ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माहितीनुसार, मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी कडक कारवाई केली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारावर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला निघालेल्या ४ प्रवाशांना अडवण्यात आले. जेव्हा या प्रवासांच्या बॅगांची तपासणी केली असता, हँडबॅगमध्ये बनवलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये परकीय चलन सापडले आहे.
यामध्ये पाउंड स्टर्लिंग आणि अमेरिकन डॉलर्स मिळून १.९३ कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त केले आहे. ४ प्रवाशांच्या बॅगेतून ५३ छोट्या पाउचमध्ये ठेवलेले हिरे सापडले आहेत. तर जप्त केलेल्या हिऱ्यांची किंमत १.१० कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे ४ प्रवाशांनी परकीय चलन आणि हिरे कस्टम्स विभागाकडे दाखवले नव्हते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात चलन आणि हिरे निर्यात करण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे या ४ प्रवाशांकडे सापडली नाहीत. या प्रकरणात हवाला ऑपरेटर आणि चलन पुरवणार्या व्यक्तीला पकडले आहे. या तस्करी प्रकरणात कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून हवाला ऑपरेटरसह एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. भारतातील कस्टम्स कायदा १९६२ अंतर्गत ही कडक कारवाई करण्यात आली आहे.





