माजी आमदाराच्या फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टी,माजी आमदाराला पोलिसांनी घेतले ताब्यात; तर चाचणीत टीडीपी खासदार आढळले पॉझिटिव्ह, राजकीय वर्तूळात खळबळ

SHARE:

तेलंगणा – हैदराबादच्या बाहेर ड्रग्ज पार्टी सुरू असलेल्या एका फार्महाऊसवर तेलंगणा पोलिसांनी शनिवारी छापा टाकला. दरम्यान ड्रग्ज पॉझिटिव्ह आढळलेल्या सहा जणांपैकी एलुरूचे खासदार पुट्टा महेश कुमार यादव हे एक होते. त्यांना स्टेशन जामीन मंजूर करण्यात आला आहे. हे फार्महाऊस मोईनाबाद येथील बीआरएसचे माजी आमदार पायलट रोहित रेड्डी याचे असून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.या छाप्यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

साउथ फस्टच्या वृत्तानुसार, पोलिसांना संध्याकाळी शनिवारी ७.३० च्या सुमारास मोईनाबाद येथील फार्महाऊसमध्ये ड्रग्ज सेवन केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला. परिसरात प्रवेश करत असताना पोलिसांना गोळीबाराचे आवाज ऐकू आले. सुरुवातीला त्यांना वाटले की पार्टीला उपस्थित असलेल्यांना सावध करण्यासाठी कोणीतरी हवेत गोळीबार केला असावा. मात्र पोलिसांनी एका व्यक्तीला हवेत गोळीबार करताना पाहिले आणि त्याला ताबडतोब ताब्यात घेतले.

झडती दरम्यान, पोलिसांना सुमारे दोन ग्रॅम कोकेन आणि त्याच मादक पदार्थाच्या पांढऱ्या पावडरचे अंश सापडले. पोलिस येताच दिल्लीतील रिअल इस्टेट व्यावसायिक नमित शर्माने बंदुकीतून एक गोळीबार केला, रोहित रेड्डीचा धाकटा भाऊ रितेश रेड्डी याच्या मालकीच्या या बंदुकीचा वैध परवाना आहे, परंतु, नमित शर्मानेच तो गोळीबार केला.
पहिल्या फेरीतील मूत्र चाचण्यांमध्ये रोहित रेड्डी, नमित शर्मा, रितेश रेड्डी, कौशिक रवी आणि अर्जुन रेड्डी या पाच व्यक्तींचे पॉझिटिव्ह निकाल दिसून आले. मात्र एरागड्डा सरकारी रुग्णालयात केलेल्या त्यानंतरच्या रक्त चाचण्यांमध्ये महेश कुमार यादव यांनी देखील ड्रग्जचे सेवन केल्याचे पुष्टी झाली. महेश यादव तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या माजी अध्यक्षांचा मुलगा आहे.

पार्टीत वापरलेले ड्रग्ज राज्याबाहेरून आणले असावेत असाही पोलिसांना संशय आहे. त्यांना अशी माहिती मिळाली आहे की ड्रग्ज शिमला येथून आणले गेले होते, परंतु पोलिस ड्रग्ज प्रत्यक्षात शिमलाहून आले होते की गोव्याहून आले होते याची पडताळणी करत आहोत. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की बेंगळुरू येथील वकील कौशिक रवीने ड्रग्ज आणले असावेत. पार्टीत उपस्थित असलेले लोक एकमेकांशी कसे जोडले गेले हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस आता करत आहेत.

फार्महाऊस पार्टीत उपस्थित रोहित रेड्डी, पुट्टा महेश कुमार यादव, एम रमेश, व्ही श्रवण कुमार, रितेश रेड्डी, विजया कृष्णा, कौशिक रवी, सरिफ रेड्डी, अर्जुन रेड्डी आणि नमित शर्मा यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि पुढील फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पोलिसांना संशय आहे कि फार्महाऊसचा वापर प्रभावशाली व्यक्तींसह खाजगी अंमली पदार्थांच्या पार्टीसाठी केला जात होता.

पुरवठा साखळी शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील रिअल इस्टेट व्यवसायिक असलेल्या नमित शर्माने पोलिसांना सांगितले की तो तिरुमला वेंकटेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेशला गेला होता. मात्र पोलिस अधिकारी त्याचे दावे आणि त्याच्या भेटीचा उद्देश पडताळत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा