नागपूर – विद्यापीठाच्या मुलींसोबत धावत्या रेल्वेत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघड झाला आहे. नागपूर विद्यापीठाच्या महिला कराटे संघाच्या मुलींसोबत धावत्या रेल्वेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर विद्यापीठाच्या या मुली भुवनेश्वरहून बालासोरकडे जात असताना फलकनुमा एक्स्प्रेसमध्ये काही तरुणांनी विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले आहे. त्यांनी मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे देशातील महिला खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूर विद्यापीठाचा १० ते १२ मुलींचा कराटे संघ शनिवारी स्पर्धेसाठी रेल्वेने गेला होता. भुवनेश्वरला पोहोचल्यानंतर हा संघ बालासोरकडे जाण्यासाठी फलकनुमा एक्स्प्रेस मध्ये चढला. याच प्रवासात काही टवाळखोर तरुणांनी विद्यार्थिनींना त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणांनी विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत अश्लील चाळे केले. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी धीर एकवटून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आणि तातडीने आपल्या कुटुंबियांना पाठवला आहे.
नागपूर विद्यापीठ प्रशासनाचा हलगर्जीपणा आता समोर आला आहे. या घटनेत विद्यापीठ प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामूळे मुलींना त्रास झाला आहे. कराटे संघात १०-१२ मुली असताना त्यांच्यासोबत केवळ एक महिला आणि एक पुरुष प्रशिक्षक देण्यात आले होते. प्रवासात हे प्रशिक्षक दुसऱ्या डब्यात होते, तर विद्यार्थिनी वेगवेगळ्या डब्यांमध्ये विखुरलेल्या अवस्थेत प्रवास करत होत्या. मुलींच्या डब्यात कोणीही जबाबदार व्यक्ती नसल्याचा फायदा घेत तरुणांनी गैरवर्तनाचे कृत्य केले आहे.
यामुळे नागपूर विद्यापीठाने विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत दाखवलेल्या हलगर्जीपणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रवासात घडलेल्या या प्रकारानंतर विद्यार्थिनींनी रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधला. माहिती मिळताच आरपीएफच्या जवानांनी संबंधित डब्यात धाव घेतली. गैरवर्तन करणाऱ्या तरुणांना जवानांनी ताब्यात घेतले. आणि त्यांना पुढच्या स्टेशनवर रेल्वेतून खाली उतरवून पुढील कडक कारवाई केली आहे.
मात्र खेळांच्या स्पर्धेसाठी जाणाऱ्या मुलींसोबत असा गैरवर्तनाचा प्रकार घडल्याने नागपूर विद्यापीठाचा नियोजनशून्य कारभार आता समोर आला आहे. नागपूरच्या मुलींसोबत धावत्या रेल्वेत असा गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार घडल्यामूळे, देशभरातील प्रवास करणार्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.





