मुंबई – देशात गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. बँक खात्यातून लाखो रुपयांची लुट होत आहे. भारतात गॅस बुकिंगच्या नावाखाली सायबर फ्रॉडचे प्रकार वाढले आहेत. काही मिनिटांत खात्यातून लाखो रुपये लुटले जात आहेत. भारत देशात गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेतला जात आहे. तर गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक खात्यांवर डोळा ठेवून विविध क्लृप्त्या वापरत आहेत.
देशातील अनेक प्रकरणांतून सायबर फसवणुकीच्या घटना उघड होत आहे. फोन कॉल, बनावट वेबसाइट, सोशल मीडियावरील संदेश तसेच व्हॉट्स ॲप लिंकच्या माध्यमातून गॅस बुकिंग किंवा सबसिडी अपडेट करण्याचे खोटे आश्वासन दिले जात आहे. भारतातील सायबर फसवणुक करणारे लोक स्वतःला गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचे सांगून ग्राहकांशी संपर्क साधतात. तुमची गॅस सबसिडी अपडेट करायची आहे, बुकिंग कन्फर्म करा ,किंवा गॅस कनेक्शन बंद होईल अशा कारणांनी नागरिकांना फसवले जाते.
त्यानंतर मोबाईलवर लिंक पाठवली जाते किंवा ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ही लिंक किंवा ॲप बनावट असून त्यावर वैयक्तिक व बँक तपशील भरताच सायबर गुन्हेगार खात्यातील पैसे लुटतात. यानंतर काही मिनिटांतच बँक खात्यातून हजारो ते लाखो रुपयांची रक्कम काढली जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेकांना पैसे कापल्यानंतरच फसवणुकीची जाणीव होत आहे. देशातील ज्येष्ठ नागरिक आणि डिजिटल व्यवहारांबाबत कमी माहिती असलेले लोक या जाळ्यात अधिक अडकत आहेत.
भारतातील सायबर तज्ज्ञांच्या मते गुन्हेगार लोकांच्या भीतीचा आणि देशातील आताच्या परिस्थितीचा फायदा घेत आहेत. सबसिडी थांबेल किंवा कनेक्शन बंद होईल, अशा धमक्या देऊन नागरिकांना घाबरवले जात आहे. मात्र देशातील नागरिकांनी बँक किंवा गॅस एजन्सी कधीही फोनवरून ओटीपी किंवा बँक तपशील मागत नाही, हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गॅस बुकिंगसाठी नेहमी अधिकृत ॲप, वेबसाइट किंवा एजन्सीचा अधिकृत संपर्क क्रमांक वापरावा.
अज्ञात कॉल, संशयास्पद लिंक किंवा अनोळखी संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणालाही ओटीपी, एटीएम तपशील, सीव्हीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड देऊ नये. तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची खातरजमा करणे आवश्यक आहे. अनेकदा बनावट वेबसाइट अधिकृत संकेतस्थळासारखी दिसते, त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते आहे. आर्थिक व्यवहार करताना नेहमी अधिकृत आणि सुरक्षित माध्यमांचा वापर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. देशात ऑनलाईनच्या नावाखाली लाखो नागरिकांची फसवणुक केली जात आहे, असे भारतातील सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे.





