मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे, तर राज्यातील अनेक जिल्ह्यात द्राक्ष बागांसह, आंबा, काजू, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पावसाने फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्याती काही भागात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसत आहे. यांमुळे राज्यातील फळ बाग शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.
द्राक्ष बागांसह, आंबा, काजू, केळी उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात गारांचा तुफान पाऊस झाला आहे. सांगोला तालुक्यातील जुनोनी, जुजारपूर परिसरात गारांचा पाऊस झाल्याने द्राक्ष आंबा आणि डाळींबाचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळ शेतातील द्राक्षांचे मणी फुटले आहेत तर डाळींबाचा मोहोर गळून पडला आहे. त्याशिवाय फळाला आलेल्या केशर आंब्याचे ही मोठे नुकसान झाले आहे. अनेक आंब्यांच्या झघडांच्या कैऱ्या पडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
काढणीला आलेला गहू आणि शेतातून काढलेल्या ज्वारीलाही याचा मोठा फटका बसला आहे. सांगोला तालुक्यातील डिकसळ जुनोनी, तिप्पेहळी, जुजारपूर, करांडेवाडी, गौडवाडी, कोळे, बुद्धेहाळ या गावांमध्ये जोरदार गारांचा पाऊस झाला आहे. शेतमालाचे बरेच नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गारांचा मोठा पाऊस झाला आहे.सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात धुमाळवाडी सह गिरवी भागात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला आहे.
या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांसह धुमाळवाडीतील डाळींब फळाबरोबर आंब्याचा मोहराचे देखील नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेती पिकांवर परिणाम होणार आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील ताहाराबाद येथे अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली आहे. काढणीला आलेला कांदा व शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सटाणा तालुक्यातील मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद परिसरात जोरदार पाऊस पडला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शिरोली महागाव परिसरात वादळी वारा व गारपिटीसह अवकाळी पावसाने मका पिकाला फटका बसला आहे. हवामान विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव शहरात अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. तर सोयगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव झाला आहे. रस्त्यावर आणि घरांच्या छतावर गारा पडल्या आहेत. मार्च महिन्यात अशा प्रकारे गारांचा पाऊस पडल्याने गारपिटीमुळे हवेत तात्पुरता गारवा निर्माण झाला आहे. राज्यातील अवकाळी पावसामूळे फळ पिकांचे नुकसान होण्याची शक्ता आहे.





