नवी दिल्ली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली त्यावेळी सरकारकडून सांगण्यात आले होते कि नोबंदीमुळे बनावट नोटांवर प्रतिबंध लागेल. मात्र आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गृह राज्य गुजरात मधूनच एक बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा भंडाफोड पोलिसांनी केला आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेने सुरत येथे नकली नोटा छापणाऱ्या आश्रमाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या आश्रमातून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त केल्या आहेत. सुरत जवळील कामरेज तालुक्यातील येथील पारडी गावात ‘श्री सत्य योग फाउंडेशन’ या आश्रमात काळा धंदा सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी योग गुरू प्रदीप जोतंगिया याच्यासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, क्राईम ब्रँचचे डीसीपी अजित राजिया यांनी सांगितले की काही व्यक्ती बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, एक एसीपी आणि एक पीआय यांचा समावेश असलेले एक पथक तयार करण्यात आले आणि अहमदाबादच्या अमराईवाडी परिसरात एक फॉर्च्युनर कार थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान, वाहनातून २.३८ कोटी रुपयांच्या बनावट ५०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.
पोलिसांच्या तपासात असे उघड झाले की, सत्यम योग फाऊंडेशनच्या वाहनातून बनावट नोटांची तस्करी केली जात होती. नोटांच्या पुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कार्डांवर भारत सरकार आणि आयुष मंत्रालयाची नावे लिहिलेली होती. आतापर्यंतच्या तपासात असे उघड झाले आहे की बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारा विशेष कागद चीनमधून आयात करण्यात आला होता. पेमेंट क्रिप्टोकरन्सीद्वारे केले जात होते. क्राईम ब्रँचने अहमदाबाद आणि सुरतमध्ये छापे टाकून हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आणले.
आश्रमात छापलेल्या सर्व ५०० रुपयांच्या नोटांवर 1 रुपयाचे मूल्य होते. या बनावट नोटा सुरतमध्ये तयार करून चलनात आणण्यासाठी अहमदाबादला आणल्या जात होत्या. पोलीस आरोपींची चौकशी करत असून, या नोटा चलनात आणल्या जात असलेल्या ठिकाणांचा तपास करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी लोक सामील असल्याचा संशय आहे, जे हळूहळू बाजारात या नोटा प्रसारित करत होते.
या रॅकेटमधील मुख्य आरोपी, प्रदीप जोटांगिया, ‘गुरुजी’ या नावाने ओळखला जातो. तो सुरतमध्ये ‘सत्यम योग फाउंडेशन’ नावाचा एक आश्रम चालवत होता. या आश्रमातून परदेशातून आयात केलेली अनेक बनावट नोटा छापण्याची यंत्रे आणि प्रिंटर जप्त करण्यात आले आहेत. तपासात असे उघड झाले आहे की, या आश्रमाचा वापर आध्यात्मिक कार्यांऐवजी बनावट नोटा छापण्यासाठी केला जात होता.
गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे रॅकेट सुमारे सहा महिन्यांपासून सक्रिय होते आणि या काळात २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा बाजारात चलनात आणल्या गेल्या. या नोटांच्या पुरवठ्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाची बनावट नेमप्लेट असलेल्या एका गाडीचा वापर केला जात होता.
सुरत गुन्हे शाखेने सुरत शहरातील सारथना भागातील कृष्णा रो हाऊसच्या घर क्रमांक ७७ वर छापा टाकला. या घरातून लाखो रुपयांची बनावट नोटा आणि एक प्रिंटरही जप्त करण्यात आला. योगगुरू प्रदीपचा जोतंगियाचा सहकारी मुकेश पटेल याच घरात राहत होता. मुकेश पटेलला देखील ताब्यात घेण्यात आले असून, या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतरांना ओळखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी एक विशिष्ट योजना आखण्यात आली होती. तपासात ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा घेवून १५०० रुपयांच्या बनावट नोटा देण्याची योजनेचा पर्दाफाश करण्यात आला. पंचनामा करताना ४० हजारांहून अधिक नोटांचे अनुक्रमांक नोंदवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. पोलिसांनी प्रिंटिंग मशीन, कम्प्युटर, विशेष कागदे, रंग आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.





