अनेक बँकांनी नियमात केले बदल, एटीएम आणि यूपीआय व्यवहार महाग होण्याची शक्यता

SHARE:

नवी दिल्ली – अमेरिका-इस्रायल आणि ईराणमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. देशातील अनेक बँकांनी आपल्या नियमात बदल केले आहेत. काही बँकांमधील एटीएम सुविधेत तर काही बँकांमध्ये यूपीआय सेवेतील व्यवहार मर्यादेवर बंधन लावली आहेत. त्यामुळे यापुढे यूपीआय ट्रान्जेक्शनवर मर्यादा येणार असून एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत देखील बदल होणार आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून एटीएममधील पैसे काढणं महाग होण्याची शक्यता आहे.

१ एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बंधन बँकेसह अनेक बँकांनी पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांच्या दैनंदिन एटीएम वापरावर होणार आहे. या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे यूपीआय आधारित एटीएम व्यवहार. आतापर्यंत कार्डशिवाय पैसे काढणे वेगळ्या प्रकारात गणले जात होते. मात्र, आता अशा व्यवहारांनाही मासिक ‘फ्री ट्रान्झॅक्शन लिमिट’मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. सध्या बँकेच्या एटीएममध्ये साधारण ५ फ्री ट्रान्झॅक्शन मिळतात. इतर बँकांच्या एटीएममध्ये मेट्रो शहरांत ३ आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये ५ ट्रान्झॅक्शन फ्री असतात. यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी २३ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेने काही डेबिट कार्डसाठी दैनंदिन पैसे काढण्याच्या मर्यादेत बदल केले आहेत. काही कार्डांवरील मर्यादा एक लाखांवरून ५० हजार रुपये करण्यात आली तर काही कार्डांवरील मर्यादा दीड लाखांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे. बंधन बँकेनेही एटीएम व्यवहारांसाठी नवे नियम जाहीर केलेत.

स्वतःच्या एटीएममध्ये ग्राहकांना दर महिन्याला ५ ट्रान्झॅक्शन मोफत मिळणार आहेत, तर नॉन-फायनान्शियल व्यवहारांवर कोणतीही मर्यादा नाही. इतर बँकांच्या एटीएममध्ये मेट्रो शहरांमध्ये ३आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये ५ ट्रान्झॅक्शन मोफत असेल. या मर्यादेनंतर आर्थिक व्यवहारासाठी २३ रुपये आणि नॉन-फायनान्शियल व्यवहारासाठी १०  रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने व्यवहार फेल झाल्यास २५ रुपये शुल्क आकारले जाईल.

Leave a Comment

अधिक वाचा