डॉक्टरच बनला चोर! कल्याणमध्ये ‘बंटी-बबली’चा धुमाकूळ, लावला लाखोंचा गंडा, नेमके काय घडले?

SHARE:

मुंबई : कल्याणमध्ये एका डॉक्टर दांपत्याने दुसऱ्या डॉक्टर आणि फार्मासिस्टला ७० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. ५० खाटांच्या रुग्णालयात मेडिकल स्टोअर सुरू करून देण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील डॉ. प्रसाद साळी आणि त्यांच्या पत्नीने ही फसवणूक केली. पोलिसांनी डॉ. प्रसाद साळी यांना अटक केली असून, त्यांची फरार पत्नी वैशाली साळीचा शोध सुरू आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूप असं मानलं जातं. त्याला जीव वाचवणारा, नवं जीवदान देणारा असंही म्हटलं जातं. पण एखादा डॉक्टरच फसवूक करणारा निघाला तर? कल्याणमध्ये असाच काहीस प्राकर घडला आहे. एका डॉक्टर दांपत्याने दुसऱ्या डॉक्टरला फसवून लाखोंचा गंडा घातला. हो, हे खरं आहे. मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेलं कल्याण शहर फसवणुकीच्या घटनेने हादरलं आहे. तिथे एका डॉक्टरनेच दुसऱ्या डॉक्टरला आणि फार्मासिस्टला तब्बल ७० लाख रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

५० बेड्सच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर सुरू करून देतो, असे आमिष दाखवून ठाण्यातील डॉ. प्रसाद साळी आणि त्यांच्या पत्नीने ही फसवणूक केल्याची माहिती समोरी आली. गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या या ‘बंटी-बबली’ जोडीपैकी डॉ. प्रसाद साळी याला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर त्याची पत्नी ही अद्याप फरार आहे. पोलिसांनी डॉ. प्रसाद याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर फरार पत्नीचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. फसवणुकीच्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनीच एकमेकांना लाखो रुपयांना फसवल्याची घटना कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणारे डॉ. प्रसाद साळी आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी, कल्याणमधील डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

खरंतर २०२४ साली डॉ. प्रसाद साळी यांनी कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या ‘आयकॉन’ बिल्डिंगमध्ये ५०  खाटांचे हॉस्पिटल सुरू करणार असल्याचे सांगितले होते. या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर चालवण्यासाठी जागा देतो, असे आमिष त्यांनी डॉ. राहुल दुबे आणि प्रज्ञा कांबळे यांना दाखवले. यासाठी साळी दाम्पत्याने त्यांच्याकडून तब्बल ८० लाख रुपयांची मागणी केली होती, ज्यापैकी ७० लाख रुपये चेकद्वारे देण्यात आले होते. डॉ. प्रसाद यांनी ३ महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटून गेले तरी ना हॉस्पिटल सुरू झालं ना मेडिकल स्टोअरसाठी जागा मिळाली.

अटक टाळण्यासाठी कल्याण सत्र न्यायालयात धाव

हे पाहून अखेर डॉ. दुबे आणि कांबळे यांनी जेव्हा साळी यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा साळी दाम्पत्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सगळा प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर साळी दाम्पत्याने अटक टाळण्यासाठी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, फसवणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्यात न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

डॉक्टर दांपत्य फरार

तेव्हापासून डॉ. साळी आणि त्यांची पत्नी, हे दाम्पत्य फरार झालं होतं. अखेर खडकपाडा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे डॉ. प्रसाद साळी याला बेड्या ठोकत अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता, कोर्टाने त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात डॉ. प्रसादची पत्नी वैशाली साळी ही देखील आरोपी सध्या ती मात्र फरार आहे, पोलीसांकडून तिचा कसून शोध घेण्यात येत आहे. या फसवणुकीच्या जाळ्यात अजून काही डॉक्टर किंवा पॅथॉलॉजिस्ट अडकले आहेत का, याचा तपासही आता पोलीस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा