व्यवसाय : मध्य-पूर्वेतील युद्धामुळे केवळ गॅस, इंधनावरच परिणाम झाला असे नाही, तर मद्यप्रेमींनाही मोठा फटका बसला आहे. बिअर प्रेमींना या तणावाचे चटके सहन करावे लागणार आहे. त्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. या उन्हाळ्यात बिअरच्या किंमतींनी मोठी झेप घेतल्याचे दिसते.
मध्य-पूर्वेत मोठा संघर्ष उडाला आहे. त्याचे जागतिक परिणाम सर्वच देश अनुभवत आहेत. अनेक देशात इंधन आणि गॅसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या देशात वर्क फ्रॉम होम पासून इतर उपाय करण्यात येत आहे. पेट्रोल पंप बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमान फेऱ्या सुद्धा कमी झाल्याने पर्यटक चिंतेत आहेत. ऊर्जा संकटामुळे अनेक देश वेठीस धरल्या गेले आहेत. इतकेच नाही तर मद्यप्रेमींची काळजी वाढवणारी बातमी समोर येत आहे. इकोनॉमिक्स टाईम्सच्या एका वृत्तानुसार, कच्चा मालाची कमी आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे मद्य तयार करणाऱ्या कंपन्यांचे गणित बिघडवले आहे. त्यामुळे बिअरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याची बिअरप्रेमींच्या खिशाला झळ बसणार आहे.
होर्मुज स्ट्रेटमुळे वाढल्या अडचणी
हे युद्ध आखाताच्या जवळपास लढले जात आहे. पण त्याचा जगातील बड्या महासत्तांना फटका बसला आहे. अनेक छोट्या देशांमध्ये ऊर्जेचे भीषण संकट उद्भवले आहे. पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेसह अनेक देशातील व्यापार आणि देशातील सर्वच घटकांवर मोठा परिणाम झाला आहे. भारत हा गरजेच्या जवळपास 90 टक्के कच्चे तेल आयात करतो. हे इंधन इराणजवळील होर्मुज स्ट्रेट नावाच्या चिंचोळ्या समुद्र मार्गाद्वारे जातो. हा मार्ग गेल्या 30 दिवसांपासून भू-राजकीय संघर्षाचे केंद्र बिंदू ठरला आहे. इराणने भारत, चीन, रशिया, पाकिस्तानव्यतिरिक्त इतर देशांसाठी हा मार्ग बंद ठेवल्याने गॅस आणि कच्चा तेलाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
बाटलीपासून ते कॅनपर्यंत सर्वच महाग
बाजारात बिअर बॉटल ते कॅन याप्रकारात देण्यात येते. हे तयार करण्यासाठी कंपन्यांना कच्चा माल आयात करावा लागतो. त्यासाठी कारखान्यांना गॅसची गरज असते. गॅसची टंचाई सुरू झाल्यापासून या कंपन्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काचेची बॉटल तयार करणाऱ्या कारखान्यांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. काही कंपन्यांचे काम ठप्प पडले आहे. ब्रुअर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या दाव्यानुसार या घडामोडींमुळे काचेच्या बॉटलच्या उत्पादन खर्चात 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याने बिअरच्या किंमतीत मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.
किंमतीत 15 टक्के वाढीची मागणी
बिअर तयार करण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी मोठा खर्च येत असल्याने बिअर कंपन्यांनी आता बिअरच्या किंमतीत १५ टक्के वाढीची मागणी केली आहे. अनेक दिग्गज बिअर कंपन्यांनी बिअरच्या किंमतीत मोठी वाढ करण्याची मागणी लावून धरली आहे. उन्हाळ्यात बिअरची मागणी वाढते. ऐन मौसमातच बिअरच्या किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता असल्याने बिअरप्रेमींच्या घशाला कोरड पडली आहे. कारण आता सगळीकडे महागाई वाढत असताना बिअरची चव सुद्धा जास्त कडू लागणार आहे. बिअर बॉटलसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.





