IPL २०२६ , SRH विरुद्ध LSG: लखनौ सुपर जायंट्सचा पहिला विजय, हैदराबादला ५ गडी राखून हरवलं.

SHARE:

खेळ : आयपीएल २०२६ स्पर्धेच्या दहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आमनासामना झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १५६ धावा केल्या. या धावा लखनौने १९.५ षटकात ५ गडी गमवून पूर्ण केल्या.

आयपीएल २०२६ स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. आतापर्यंत १० सामन्यांचा खेळ संपला आहे. दहाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय सहासी होता असं म्हणायला हरकत नाही. कारण सनरायझर्स हैदराबादकडे आक्रमक फलंदाजांची फौज आहे. त्यात दुपारचा सामना असल्याने दव फॅक्टरचा प्रश्नच नव्हता. अशा स्थितीतही लखनौ सुपर जायंट्सने भेदक गोलंदाजी केली. तसेच सनरायझर्स हैदराबादला २० षटकात ९ गडी घेऊन १५६ धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी १५७ धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं सोपं होतं. पण तसं झालं नाही. ऋषभ पंतला या विजयासाठी झुंजावं लागलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे हा विजय मिळवता आला. यासह लखनौ सुपर जायंट्सने या स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. लखनौ सुपर जायंट्सने ५ गडी राखून विजय मिळवला.

लखनौ सुपर जायंट्सचा डाव
लखनौ सुपर जायंट्सकडून एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी चांगली सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर एडन मार्करम आणि ऋषभ पंतने ४० धावांची भागीदारी केली. एडन मार्करम बाद झाल्यानंतर आयुष बदोनी आला. त्याचा खेळ फक्त १२ धावांवर आटोपला. निकोलस पूरन फक्त १ धावेवर धावचीत झाला. १०५ धावा असताना चौथी विकेट पडल्याने दडपण वाढलं होतं. पण ऋषभ पंतने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. संघ अडचणीत आल्याचं पाहून सावध पण धावांची गती कायम ठेवली. अब्दुल समद १२ धावांवर खेळताना झेलबाद झाला आणि पुन्हा एकदा दबाव वाढला. पण एका बाजूने ऋषभ पंतने खेळ सुरू ठेवला. शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंवर पंतने दोन चौकार मारले आणि विजय सोपा झाला.

सनरायझर्स हैदराबादचा डाव
सनरायझर्स हैदराबादची सुरूवात काही चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा खातं न खोलता बाद झाला. त्यानंतर ट्रेव्हिस हेडचा खेळ फक्त ७ धावांवर आटोपला. इशान किशन १ धाव करून तंबूत परतला. लियाम लिव्हिंगस्टोनही फक्त १४ धावा करू शकला. संघ अडचणीत असताना हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६३ चेंडूत ११६ धावांची भागीदारी केली. हेनरिक क्लासेनने ६२ , तर नितीश कुमार रेड्डीने ५६ धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे डाव सावरला. त्यानंतर तळाचे फलंदाज काही खास करू शकले नाहीत. हर्ष दुबे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर शिवांग कुमार ५ धावा करून तंबूत परतला. लखनौकडून मोहम्मद शमी २ , प्रिन्स यादव २ , आवेश खान २ , दिग्वेश सिंह राठी १ आणि मणिमरन सिद्धार्थ १ गडी बाद केला.

Leave a Comment

अधिक वाचा