नवी दिल्ली – गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी दिल्लीतील कांजवला परिसरातील एका कारखान्यावर छापा टाकून बनावट सेन्सोडाइन टूथपेस्ट बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. छापादरम्यान मोठ्या प्रमाणात बनावट टूथपेस्ट, यंत्रसामग्री आणि कच्चा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मुख्य आरोपी हरिओम मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले जप्त केलेल्या मालाची किंमत अनेक लाख रुपये होती आणि अस्वच्छ परिस्थितीत या मालाचे उत्पादन केले जात होते. त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. या कारवाईदरम्यान सहा कामगार एका प्रसिद्ध टूथपेस्ट ब्रँडच्या ट्यूबमध्ये स्थानिक पातळीवर तयार केलेली पेस्ट भरताना दिसले. कामगारांनी पोलिसांना सांगितले की हा कारखाना रोहिणी येथील रहिवासी हरि ओम मिश्रा नावाचा व्यक्ती चालवत होता. त्तो कोणत्याही परवान्याशिवाय, बिलांशिवाय किंवा अधिकृत कागदपत्रांशिवाय भाड्याच्या जागेतून काम करत होता.
पोलिसांनी सांगितले की त्यांनी अंदाजे १,८०० भरलेल्या बनावट टूथपेस्टच्या ट्यूब, १०,००० हून अधिक रिकाम्या ट्यूब आणि १,२०० हून अधिक पॅक केलेल्या ट्यूब, ट्यूब भरण्याचे आणि सील करण्याचे मशीन, सेन्सोडाइन ब्रँडिंग असलेले पुठ्ठ्याचे खोके, झाकणे, श्रिंक स्लीव्ह्ज, हीटिंग गन, गोंद आणि इतर पॅकेजिंग साहित्य देखील जप्त करण्यात आले. ड्रममध्ये साठवलेली अंदाजे १३० किलोग्रॅम निळी पेस्टही जप्त करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. बहुतांश कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशातील आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले ब्रँडचे अधिकृत प्रतिनिधी श्री. राजेश कुमार यांच्याकडून पोलिसांनी या प्रकरणाची पुष्टी केली, त्यांनी सर्व वस्तू बनावट असल्याची माहिती दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार रोहिणीच्या सेक्टर २ चा रहिवासी असलेल्या हरि ओम मिश्रा नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने चौकशीदरम्यान कबूल केले की, त्याने एक गोदाम भाड्याने घेऊन रिकाम्या सेन्सोडाइन ट्यूबमध्ये स्थानिक पातळीवर तयार केलेली पेस्ट भरली आणि कोणताही वैध परवाना किंवा परवानगीशिवाय बाजारात विकली. गुन्हे शाखा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि कॉपीराइट कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता कच्च्या मालाचे पुरवठादार, इतर साथीदार आणि संपूर्ण वितरण नेटवर्क ओळखण्यासाठी पुढील तपास करत आहेत.
पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की गोदामात अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत सेन्सोडाइन या ब्रँड नावाने स्थानिक, निकृष्ट दर्जाच्या पेस्टची पॅकेजिंग केली जात होती. ही बनावट उत्पादने बाजारात अस्सल म्हणून विकली जात होती, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी बऱ्याच काळापासून या बेकायदेशीर व्यवसायात गुंतला होता.





