जळगाव – ज्वारी खरेदीचे टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागल्यामुळे गर्दी झाली. त्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेत ३ ते ४ शेतकरी जखमी झाले असून जखमींवर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भडगाव तालुक्यात ही घटना घडली. या घटनने शेतकर्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
माहितीनुसार, मंगळवारी शेतकर्यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव शेतकरी संघासमोर ज्वारी खरेदीसाठी एमएसपीअंतर्गत ऑनलाईन नोंदणी टोकन मिळवण्यासाठी गर्दी केली होती. शेतकरी भर उन्हात लांबच लांब रांगेत उभे होते. मात्र, प्रशासनाकडून ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती, ना सावलीची सोय करण्यात आली होती. या दरम्यान शेतकर्यांची मोठी गर्दी झाली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे.
या घटनेवरून शेतकरी पाटील यांची मुलगी राधिका पाटील हिनेही तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या कि माझे वडील रात्रीपासून उपाशीपोटी रांगेत उभे होते. त्यांना इतका मार लागला की भडगाव ते जळगावपर्यंत रक्त थांबत नव्हते. पोलिसांचे काम संरक्षणाचे आहे, मारहाणीचे नाही. आम्ही याविरोधात कायदेशीर लढाई लढणार.
याशिवाय एका जखमी शेतकरी संजय शांताराम पाटील यांनी देखील या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले कि आम्ही काही चोर नव्हतो, आम्ही आमच्या पिकाच्या विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी आलो होतो. पोलिसांनी योग्य नियोजन करण्याऐवजी आमच्यावर लाठीचार्ज केला, असा आरोप शेतकरी संजय शांताराम पाटील यांनी केला आहे. या घटनेमुळे शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे.





