पुणे – राज्यात भाजपा सरकारने अजित दादांचा घातपात आहे की अपघात आहे, याविषयी एफआयआर नोंदवावी, असे बारामतीचे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी म्हटले आहे. तर बारामतीत जनतेच्या मनातील प्रश्न मांडून विजय मिळवू, असा विश्वास बारामतीचे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी व्यक्त केला आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. बारामतीतील काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सरकारने एफआयआर दाखल केल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे वक्तव्य काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी केले आहे.
काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी सध्याच्या भावनिक वातावरणातही जनतेच्या मनातील प्रश्न मांडून विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पार्थ पवार यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस कडून सातत्याने विनंती केली जात आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मात्र काँग्रेस आपल्या निर्णयावरती ठाम असल्याचे दिसून येत आहे.
तर बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे उमेदवार आकाश मोरे यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने काही अटी यापूर्वी टाकलेल्या आहेत, ज्या आम्ही म्हणतो आहे की, या राज्यातील भाजपा सरकारने अजित दादांचा घातपात आहे की अपघात आहे, याविषयी एफआयआर नोंदवावी आणि आम्ही अजूनही तयार आहोत, त्यांनी एफआयआर नोंदवल्यानंतर आम्ही लगेचच आमचा अर्ज माघारी घेणार आहोत, अन्यथा आम्ही बारामतीची निवडणूक लढणार आहोत. अजित दादांना न्याय मिळावा आणि लोकशाही टिकावी यासाठी आम्ही निवडणुक लढत आहोत.
महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण पुनर्जीवित करावे, यासाठी आम्ही लढतो आहोत. शरद पवार ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी जे राजकारण केले, त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांचे जसे कॉर्डिनेशन होते, ते पूर्ण संपुष्टात आलेले आहेत. तसे पुन्हा व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जर राज्याच्या विधान भवनांमध्ये जनतेचा समस्या मांडणारा विरोधी आमदार असेल तर सत्ताधारी आमदार त्याला पाठीवर थाप टाकायचा. आणि आता राज्यात आमदारांची हाणामारी होते, ही लोकशाहीची अधोगती झाली आहे. ज्या पद्धतीने लोकशाहीची अधोगती झाली आहे, याच्या विरोधात मी निवडणुकीसाठी उभा आहे, असे बारामतीचे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आपली भूमिका नेहमी मांडत असते, लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आलेली आहे, आम्ही काँग्रेस पक्षाच्यावतीने ही जबाबदारी घेत आहोत. काँग्रेसचा कार्यकर्ता सर्वसामान्य आहे, आमच्याकडे पैशाची कसली पावर नाही, असे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे म्हणाले आहेत. पार्थ पवारांच्या वक्तव्यावर बोलताना मोरे म्हणाले, मी सेमी इंग्लिशमध्ये शिकलेला माणूस आहे, तरी मला मराठीचे काही, काही शब्द येत नाहीत. पार्थ पवार पण इंग्लिश मीडियम शिकलेले, त्यांना काय म्हणायचे होते मला माहिती नाही. पण, मला असे वाटते आहे की, त्यांना मराठी शब्द सापडला नसेल, त्यामुळे ते डाऊनफॉल म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी पक्ष आवाहन करत आहे, तुम्ही उमेदवारी अर्ज माघार घ्याल का? या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे म्हणाले, की, माझ्या मुलाखतीमध्ये किंवा लोकांशी बोलतानाही सांगतो आहे की, मी पुरोगामी विचाराचा, मी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर या राज्यातील भाजपा सरकारने अजित पवारांचा अपघात की घातपात याबाबत काही सकारात्मक गोष्टी केल्या पाहिजेत, चौकशा केल्या पाहिजेत. किंवा अजित पवार अपघात प्रकरणात एफआयआरची तर आम्ही अपेक्षा करतो आहे, पण आम्हाला काही तसे संकेत दिसले तर नंतर आम्ही आमची भूमिका घेऊ, असे बारामतीचे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे म्हणाले आहेत.





