कुंभमेळ्यासाठी मंत्र्यापासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वांचे कमिशन फिक्स; विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडिया वर व्हायरल

SHARE:

मुंबई – केंद्र आणि राज्य सरकारांनी नाशिक कुंभमेळ्यासाठी सुमारे १५,०००  कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. दरम्यान आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी टेंडर मॅनेज करून झाली आहेत. त्यामध्ये छोट्या अधिकाऱ्यापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांची टक्केवारी फिक्स झाली, असा दावा लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले मंत्रालयाचे अधिकारी विलास लाड यांनी कथित एका ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, ती व्हायरल झाल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारांकडून मंजूर करण्यात आलेल्या १५ हजार कोटी रुपयांचा निधीपैकी काही हजार कोटींचा निधी प्रत्यक्षात आला आहे. त्यामध्ये आपला कोटा ५०० कोटींचा असल्याचा दावा लाड याने केला आहे. यामध्ये आपण स्वतः ७०० तंबूंचे तसेच ई टॉयलेट अन् साफसफाईचे टेंडरही घेतल्याचा दावा त्याने केला आहे.

याव्यतिरिक्त, १८  कोटी रुपयांच्या सकाळच्या नाश्त्या आणि दुपारच्या जेवणाच्या निविदेचा उल्लेख आहे, ज्यामुळे मोठ्या नफ्याचे संकेत मिळतात. सर्वात गंभीर दावा हा आहे की कुंभमेळ्याच्या १,००० हून अधिक कामांच्या निविदा आधीच व्यवस्थापित करण्यात आल्या असून, त्यात कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांना कथित कमिशन दिले जात आहे. ऑडिओमध्ये असेही म्हटले आहे की ओळखी’च्या आधारावर कोणालाही कंत्राटे दिली जाऊ शकतात, ज्यामुळे यंत्रणेतील संभाव्य संगनमताबद्दल चिंता निर्माण होते.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठीच्या १  हजार २१ प्रकारच्या कामांचे टेंडर मॅनेज करून लोकांना देण्यात येणार आहेत आणि त्यातून आपल्याला कोट्यवधींचे कमिशन मिळणार आहे, कुंभमेळा केवळ चाळीस दिवसांचा असून त्यामध्ये एवढा खर्च येत नाही, यातून मोठं कमिशन मिळणार असल्याचा दावा विलास लाडने केला आहे. ई टॉयलेट पासून साफसफाईची हजारो कामे आहेत, त्यातून लाखो रुपये कमावता येतील असा दावा त्याने केला आहे. तुझ्या कुणी ओळखीचे लोक असतील तर त्यांना ही टेंडर देऊयात. असा विश्वास लाडने समोरच्या व्यक्तीला दिला आहे. विलास लाड सध्या कारावासात असल्याने त्याचे फोन संभाषणात केलेले दावे खरे की खोटे याची पुष्टी दै.मू.नायक करत नाही.

ही ऑडिओ क्ल्पि अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे वारंवार सांगत आहेत. मात्र या क्लिपमुळे सरकारच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसते.

Leave a Comment

अधिक वाचा