अंजनगावसुर्जीच्या महिला होणार आत्मनिर्भर; जिल्हाधिकाऱ्यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी थेट संवाद

SHARE:

अमरावती – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती मार्फत आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या किमान कौशल्य विकास कार्यक्रम (२०२५-२६ )अंतर्गत सुरू असलेल्या ‘फॅशन डिझायनर’ या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण बॅचला आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. अंजनगाव सुर्जी येथील रोशनी महिला विकास संस्थेद्वारे संचलित या प्रशिक्षणार्थीसोबत त्यांनी थेट संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणातून स्वावलंबी होण्याचा मार्ग प्राप्त होतो असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेत.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले की, “या योजनेचा उद्देश केवळ प्रशिक्षण पूर्ण करणे हा उद्देश नसून, प्राप्त कौशल्याचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे महत्त्वाचे आहे. रोशनी रेडीमेड गारमेंट फाउंडेशन, एमआयडीसी, अंजनगाव सुर्जी येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या फेब्रिक क्लस्टरमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी रोजगाराच्या संधी मिळवाव्यात आणि स्वतःच्या पायावर उभे होवून सक्षम व्हावे, असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महिलांनी केवळ वस्तूंची निर्मिती करून न थांबता, त्यांच्या मार्केटिंगवर विशेष लक्ष केंद्रित करावे. व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी बाजारपेठेची मागणी ओळखून नाविन्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थींनी केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता, उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. विविध शासकीय योजनांतर्गत उपलब्ध असलेल्या निधीचा आणि सवलतीच्या कर्ज योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे छोटे-मोठे उद्योग सुरू करावेत व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले.

या विशेष प्रशिक्षण उपक्रमात अल्पसंख्यांक समाजातील महिलांनी नोंदवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी समाधान व्यक्त केले. समाजातील सर्व स्तरांतील महिला मुख्य प्रवाहात येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्णतः मोफत राबविला जात आहे. जिल्हा उद्योग केंद्र,अमरावती यांचे निधीतून उभे राहिलेल्या स्थानिक एमआयडीसीमधील फेब्रिक क्लस्टरमध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.फॅशन डिझायनिंग सारख्या रोजगाराभिमुख कोर्सेसमुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. . जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अंजनगाव सुर्जी परिसरातील गरजू तरुणांना आणि महिलांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहेत.

या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे ,तहसीलदार पुष्पा दाबेराव, संस्थेच्या संचालिका शोभा सुने, आशिष सुने, केंद्रातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.

Leave a Comment

अधिक वाचा