सोलापूर – जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले आहेत. जिल्ह्यात एका विवाहित महिलेला एचआयव्ही पॉझिटिव्हचा खोटा रिपोर्ट दिल्यामुळे त्या महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. सोलापूर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी ३ सदस्य समिती स्थापन केली आहे. येत्या ८ दिवसात या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागात ही गंभीर घटना घडली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शासकीय आयसीटीसी केंद्रातून एका गर्भवती महिलेला चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आल्याचा आरोप एका महिलेकडून करण्यात आला आहे. या महिलेला चुकीचा एचआयव्ही पॉझिटिव्ह अहवाल दिल्यामुळे तिचा पती आणि सासरकडील मंडळींनी तिच्यावर संशय घेत त्या महिलेला घराबाहेर काढले होते. सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय, खासगी केंद्रांवर तपासणी केल्यावर सर्व अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आयसीटीसीच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ही गंभीर घटना १६ ऑगस्ट २०२४ रोजी घडली आहे. सोलापूर आयसीटीसी केंद्रात करण्यात आलेल्या तपासणीत या महिलेचा अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आला होता. या महिलेकडून मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये एचआयव्हीच्या पुन्हा चाचण्या करण्यात आल्या आहेत. सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये सोलापूर केंद्र, तसेच हिंदलॅब्स येथे करण्यात आलेल्या आणि चाचण्यांमध्ये असा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात विनाकारण सुरू करण्यात आलेल्या औषधोपचारांमुळे या पीडित महिलेच्या आरोग्यावरही परिणाम झाला असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर व अकलूज परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यातील या पीडित महिलेला न्याय आणि नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. १ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर सोलापूर जिल्ह्यातील या पीडित महिला व स्थानिक नागरिकांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापूर शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन करून चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे. एचआईव्ही मध्ये एकदा पॉझिटीव्ह झालेला रुग्ण पुन्हा निगेटिव्ह होत नसतो असे, सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात राज्यातील आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे.





