प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस; जबाबासाठी पाच दिवसांत हजर राहण्याचे निर्देश

SHARE:

अहिल्यानगर – भोंदु अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेतील संशयास्पद खाती आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे व्यवहार यामुळे आता चाकणकर कुटुंबीयांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. रुपाली चाकणकर यांची बहिण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवली असून जबाब नोंदवण्यासाठी पुढील पाच दिवसात हजर राहण्याचा अल्टिमेट दिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरात विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाच्या तपासात राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत चाकणकर यांच्यासह अनेक नावांची संशयास्पद खाती आढळून आली आहेत. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे या पतसंस्थेत एकूण ४ खाती आहेत.या खात्यांवरून तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

या खातेदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ३३ जणांचे जबाब झाले आहे. आता प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. या आर्थिक व्यवहारांचा खरातच्या सावकारी व्यवसायाशी काय संबंध आहे? हे पैसे कोणाचे आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. पाच दिवसांत शिर्डीत येऊन जबाब द्यावा, असे त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या उपलब्ध असलेल्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर पोस्टाद्वारे ही नोटीस पाठवली आहे.

अशोक खरातने पतसंस्थांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केल्याचा संशय बळावला आहे. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेली १०० खाती आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या खात्यांवरुन सुमारे ६० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यात आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यात चाकणकर नावाचेही खातेदार असून, या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाइल नंबर जोडलेला आहे.

तर सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेतही अशोक खरात नॉमिनी असलेली ३२ खाती सापडली आहेत. या खात्यांची चौकशी आता नाशिक ग्रामीण पोलिसांकडून केली जाणार आहे. एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या शहरांतील पतसंस्थांमध्ये इतके प्रभावी कनेक्शन या मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. प्रतिभा चाकणकर यांना नोटीस मिळाल्यानंतर चौकशीला हजर रहावे लागणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे अशोक खरातशी असणाऱ्या कथित संबंधांवरून रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदही त्यांना गमवावे लागले आहे. खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची माहिती आहे. पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही. तूर्त सध्याचा घटनाक्रम पाहता त्यांच्या बहिणीची चौकशी सुरू झाल्याने चाकणकर कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

अधिक वाचा