मणिपूर – राज्यात वांशिक हिंसाचारात पुन्हा एकदा वाढ झाली आहे, तर राज्यातील सुरक्षादलांवर हल्ला आणि शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ६ तरुणांना अटक करण्यात आली आहे. मणिपूर राज्याच्या उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी १० एप्रिल २०२६ रोजी हिंसाचारात सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. मिथुन मंडल असे या हुतात्मा जवानाचे नाव आहे. ते मोंगकोट चेपु परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोळी लागली आहे. या जवानाला जखमी अवस्थेत इंफाळच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ६ वाजता जखमी जवानाचा मृत्यू झाला आहे. मिथून मंडल पश्चिम बंगालमधील भगजनटोला गावचे रहिवासी होते. मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री यमनाम खेमचंद सिंह यांनी या घटनेवर तीव्र निषेध केला आहे.
मणिपूर राज्यामधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मणिपूर राज्यामध्ये फेब्रुवारी २०२६ पासून जातीय हिंसाचाराचा सामना करणाऱ्या या भागात अद्याप तणाव कायम आहे. मणिपूर राज्यात हिंसाचार भडकवणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांकडून सतत शोधमोहीम राबवली जात आहे. मणिपूर राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे मणिपूर राज्य सरकारने ५ जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवांवरील बंदी वाढवली आहे. मणिपूर राज्यातील ही मोबाईल इंटरनेट सेवांवरील बंदी इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, ककचिंग आणि बिष्णुपूर या जिल्ह्यांमध्ये लागू राहणार आहे.
मणिपूर राज्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरू नये यासाठी मणिपूर राज्यात ५ जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवांवरील बंदी वाढवण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे मणिपर राज्यसरकारने स्पष्ट केले आहे. तसेच मणिपूरमधील हिंगगांग पोलीस ठाणे परिसरात सुरक्षाबलांवर हल्ला आणि शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ६ तरुणांना अटक करण्यात आली आहे. मणिपूर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन राज्यातील प्रशासनाने केले आहे.





