आदिती तटकरे यांनी आजवर काय काय केले आहे?, त्यांनी भाटगिरी…भोंदू खरात प्रकरणात सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला संताप; प्रश्नांची केली सरबत्ती!

SHARE:

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच तटकरे यांच्यावरही टीकेचे आसूड ओढले.

भोंदू अशोक खरात प्रकरणात रोजच नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. खरात याने आतापर्यंत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आलेले आहे. दुसरीकडे त्याची संपत्ती आणि आर्थिक व्यवहार याबाबतही अचंबित करणारी माहिती समोर येत आहे. त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे आढळून आले असून आता त्याचे आर्थिक व्यवहारही तपास संस्थांच्या रडारवर आले आहेत. दुसरकीडे आतापर्यंत हाती लागलेल्या माहितीच्या आधारे भोंदू अशोक खरात आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि चाकणकर कुटुंबाचे आर्थिक संबंध असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. एकीकडे या सर्व बाबी समोर येत असताना आता दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर थेट अटकेची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सोबतच त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावरही सडकून टीका केली आहे.

आदिती तटकरे यांनी फक्त नेत्यांची भाटगिरी करणे थांबवावे
सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत भोंदू अशोक खरात, रुपाली चाकणकर यांच्यासह मंत्री आदिती तटकरे यांच्यावरही सडकून टीका केली. चकणकर यांच्या अटकेसाठी तटकरे यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले? असा रोखठोक सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. अशोक खरात प्रकरणात चाकणकर यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी, यासाठी मंत्री तटकरे यांनी काय केले आहे. आदिती तटकरे यांनी फक्त नेत्यांची भाटगिरी करणे, किती गं बाई मी हुशार हे करणे थांबवले पाहिजे, असा हल्लाबोल करत महिला बालविकास मंत्री म्हणून तटकरे यांनी चाकणकर यांच्या अटकेसाठी काय पाठपुरावा केला आहे? असं अंधारे यांनी विचारलं.

आदिती तटकरे यांनी आतापर्यंत काय केले?
तसेच, आदिती तटकरे यांना दिवंगत नेते अजित पवार यांच्याबाबतच आस्था नाही. त्यांनी अजितदादा यांच्या अपघात प्रकरणात एफआयआर व्हावी यासाठीही प्रयत्न केला नाही. चाकणकर यांच्या कोणत्या फार्महाऊसवर बुलडोझर चालवला जाईल? तटकरे यांनी याबाबत आतापर्यंत काय पत्रव्यवहार केला आहे? हे सांगणे गरजेचे आहे, असेही मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.

चाकणकर यांचा फक्त राजीनामा नव्हते तर…
तटकरे यांना महिलांची जबाबदारी घ्यायची नाही. नुसती पदं घ्यायची, पदं मागायची हे योग्य नाही. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की चाकणकर यांचा फक्त राजीनामा नव्हते तर त्यांची अटकही मला अपेक्षित आहे. आता तर चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध अधिक स्पष्ट झाले आहेत, अंधारे यांनी चाकणकर यांच्यासह तटकरे यांनाही लक्ष्य केले.

Leave a Comment

अधिक वाचा