जळगाव – भोंदूबाबा ललित पाटीलकडून एका महिला ग्राफिक डिझायनरची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. जळगावात एक भोंदूगिरीचा प्रकार समोर आला आहे. ग्राफिक डिझायनरची लाखोंची फसवणूक झाली आहे. जळगाव हादरले आहे. घरातील भांडणे थांबवून सुख शांती मिळवून देतो, असे सांगून जळगावातील एका भोंदू बाबाने उज्जैनच्या स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव शहरात अघोरी विद्या, करणी बाधा आणि गुप्त धन देण्याच्या नावाखाली एका महिला ग्राफिक डिझायनची १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी जळगावातील भोंदू बाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी महिला पोलीस कर्मचारी महिमा पाटील यांच्याविरुद्ध २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, साडेतीन ते ४ वर्षांचा कालावधी उलटूनही दोन्ही आरोपी अद्याप फरारच आहेत. पीडित फिर्यादी महिलेने नुकतीच जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेत आरोपींना शोधून तिचे पैसे परत मिळवून देण्याची विनंती केली आहे. पीडित महिला आणि आरोपी महिला पोलीस कर्मचारी महिमा पाटील या कॉलेजपासून एकमेकींच्या परिचयाच्या होत्या. घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने मैत्रिणीशी संपर्क साधला होता.
आरोपी महिला पोलीस कर्मचारी महिमा पाटीलने आपल्या पतीकडे अलौकिक शक्ती असल्याचे सांगून त्यांच्याकडे उपाय असल्याचे पटवून दिले. त्यानंतर ललित पाटील याने अंगात पीर बाबा येतात असे भासवत अघोरी विधी सुरू केले. दिराने आत्महत्या केली असून त्याच्या आत्म्याने तुझ्या घरात प्रवेश केला आहे. म्हणून तुमच्या घरात वाद आहे. तुझ्या दिराचा आत्मा तुला त्रास देतोय. म्हणून तुझ्यावर असे प्रसंग पुन्हा पुन्हा ओढवतच राहणार. तुझ्या घरावर कोणी करणी केली गेली आहे. ती बाधा काढून घेण्यासाठी तुला मोठी पूजा करावीच लागेल अशा पद्धतीने दोन्ही आरोपींनी पीडित महिलेला तिच्या कुटुंबावर करणी झाल्याची भीती दाखवून आपल्या घरी पूजा करून सुरुवातीला लहान रक्कम घेतली होती.
त्यानंतर गुप्त धन मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळले आहेत. ही रक्कम अनेक वेळा रोख तसेच ऑनलाईन व्यवहारांद्वारे घेतली आहे. पैसे मागितल्यास तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेल, अशी गंभीर धमकी या भोंदूबाबा ललित पाटीलने या पीडित महिलेला दिली होती. जळगावातील भोंदूबाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी आरोपी महिला पोलीस कर्मचारी महिमा पाटील या दोन्ही आरोपींनी पीडित महिलेसह इतर कुटुंबांना देशभर फिरवले आहे, व त्यांची फसवणुक केली आहे. उज्जैन येथील स्मशानभूमीत अघोरी पूजा, गोगामेडी, पुष्कर, अजमेर, ओंकारेश्वर येथे विविध विधी करण्यात आले.
तसेच भारत-पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिर येथे विशेष पूजा केल्याचे सांगून मोठी रक्कम घेतली आहे. जळगावात परतल्यानंतरही दोन्ही आरोपींनी पीडित महिलेच्या घरी मुक्काम करून घरातील बाधा काढण्याच्या नावाखाली पुन्हा पुन्हा पैशांची मागणी केली. बाहेरून कर्ज काढून पैसे देऊनही काहीच फरक न पडल्याने पीडित महिलेने पैसे परत मागितले असता आरोपी भोंदूबाबा ललित पाटील याने मी अघोरी आहे, पैसे मागितल्यास तुमच्या सात पिढ्यांचा नाश करेन अशी धमकी दिली. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे झाली आहेत.
तरीही या प्रकरणात दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगावातील रामानंद पोलिसांनी आरोपी महिला पोलीस कर्मचारी महिमा पाटील ही भांडुप येथे कार्यरत असल्याची माहिती मिळवली. नंतर भांडुप येथे धाव घेतली होती. मात्र, तेथे दोन्ही आरोपी सापडले नाहीत. जळगाव पोलिसांचे पथक दोन्ही आरोपींचा शोध घेत असले तरी अद्याप दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे उलटूनही दोन्ही आरोपी सापडले नसल्याने पीडित महिलेने जळगाव पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे.
या प्रकरणातील दोन्ही आरोपींचा शोध लावून आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपी महिमा पाटील ही पोलीस कर्मचारी असल्यामुळे तपासात उशीर होत असल्याचा आरोपही पीडित महिलेकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी परत चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अधिक तपास जळगाव पोलिस करत आहेत.





