तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; तपासादरम्यान पोलिसांवर धमकावल्याचा आरोप

SHARE:

हिंगोली – जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. गोरख पातळे असं या तरूण शेतकऱ्याच नाव आहे. सेनगांव तालुक्यातील धनगरवाडी या गावात ही घटना घडली. पोलिसांनी धमकावल्याने शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महिनाभरापूर्वी सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारात रोजगार हमी योजने अंतर्गत अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून १० ते १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात विहिरी न खोदताच केवळ कागदोपत्री विहिरी दाखवून शासनाची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी सेनगाव पंचायत समितीमधील तीन अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीओनी या प्रकरणातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित देखील केले.

या घोटाळ्याप्रकरणी हिंगोलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी गोरख पातळे या शेतकऱ्याला चौकशीसाठी बोलावले होते आणि तिथे मारहाण व दमदाटी करत त्यांच्याविरुद्धच कार्यवाईची धमकी दिली होती. त्यामुळे गोरख पातळे हा मानसिक दडपणाखाली होता. याच दडपणातून गोरख पातळेने आपल्या शेतातील झाडावर गळफास घेऊन जीवन संपवले, असा आरोप गोरख पातळे यांच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, गोरख पातळे याच्या आत्महत्येनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह झाडावरुन खाली उतरवू देणार नाही, अशी भूमिका गावकर्यांसह कुटुंबीयांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण प्रकरणामुळे शासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे

Leave a Comment

अधिक वाचा