आंतरराष्ट्रीय : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक अहवाल जारी केला आहे, यात इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे.
इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. अनेक देशांच्या विकास दरावर याचा परिणाम झाला आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक अहवाल जारी केला आहे, यात इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याचे समोर आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अर्थव्यवस्थेत दिसत असलेली तेजी आता थांबली आहे. IMF ने २०२६ साठी जागतिक अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज ३.४% वरून कमी करून ३.१% केला आहे. जर परिस्थिती अधिक बिघडली, तर हा दर २% पर्यंत घसरू शकतो आणि जगभरात महागाई ६% पर्यंत पोहोचू शकते. हा संपूर्ण जगाला मोठा धक्का.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ पियरे-ओलिव्हिएर गॉरिंचास यांनी सांगितले की, मध्यपूर्वेतील युद्ध हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे. यामुळे तेल आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे महागाई वाढत आहे. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. होर्मूज सामुद्रधुनीतील अडथळे आणि परिसरातील नुकसानामुळे तेल पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर बसला आहे.
अमेरिकेत मंदीचा धोका
या युद्धामुळे अमेरिकेत पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते, यामुळे ट्रम्प यांच्या देशात मंदी येण्याचा धोका वाढला आहे. IMF च्या मते, २०२६ मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था २.३% दराने वाढेल, जो आधीच्या अंदाजापेक्षा ०.१% ने कमी आहे. २०२७ साठी २.१% वाढीचा अंदाज थोडा सुधारित मानला जात आहे.
G7 देशांमध्ये ब्रिटनला सर्वाधिक फटका
G7 देशांमध्ये ब्रिटनला सर्वाधिक नुकसान झाले आहे. २०२६ साठी त्याचा वाढ दर ०.५% ने कमी करून ०.८% केला आहे, तर २०२७ साठी तो १.३% राहण्याचा अंदाज आहे. सौदी अरेबियालाही मोठा फटका बसला आहे. २०२६ साठी त्याचा वाढ दर १.४% ने कमी करून ३.१% केला आहे. मात्र, २०२७ मध्ये वाढून होऊन तो ४.५% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
चीन आणि कॅनडालाही फटका
चीन आणि कॅनडाच्या अर्थव्यवस्था वाढीच्या दरात ०.१% ने घट झाली आहे. २०२६ साठी चीनच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात ०.१% ने घट करण्यात आली आहे, तर २०२७ च्या अंदाजात कोणताही बदल नाही. कॅनडासाठीही २०२६ चा अंदाज ०.१% ने कमी करण्यात आला आहे, तर २०२७ साठी कोणताही बदल नाही.
भारत-पाकिस्तानची स्थिती चांगली
भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेने चांगली आहे. २०२६ आणि २०२७ साठी भारताच्या अंदाजात ०.१% ने वाढ करण्यात आली आहे. २०२५ मध्ये भारताचा वाढ दर ७.६% होता, तर २०२६ आणि २०२७ मध्ये तो ६.५% राहू शकतो. पाकिस्तानसाठी सर्वाधिक सुधारणा दिसून आली आहे. २०२६ साठी अंदाजात ०.४ % आणि २०२७ साठी ०.६% ने वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर २०२५ मध्ये ३.८९%, २०२६ मध्ये ३.६% आणि २०२७ मध्ये ३.५% राहण्याची शक्यता आहे.





