अकोला – राज्यात महायूतीची सत्ता असल्यानंतरही शिंदेसेना आणि भाजप नेत्यांमधील कुरघोड्या आणि आरोप- प्रत्यारोप सुरूच आहे. दरम्यान अकोला महापालिकेत भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या तक्रारीवरून महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे गटनेते सागर भारूका यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे राजकीय पारा तापला असून भाजप आणि शिंदे सेनेमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी अकोला महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेत राडा झाला होता. आरोप आहे कि यावेळी शिंदेचे गटनेते सागर भारूक यांनी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांना शिवीगाळ केली होती. तसेच ते त्यांच्या अंगावर धावून गेले. या घटनेने महापालिकेत गोंधळ उडाला होता.या वादानंतर विजय अग्रवाल यांनी सिटी कोतवाली पोलिसात सागर भारुका यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर भारूका यांना अटक केली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर लगेच स्थायी समितीची सभा घेण्यात आली होती. स्थायी समिती सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांच्या दर्जावरून अग्रवाल आणि भारुका यांच्यात जोरदार वाद झाला. भारुका यांनी गेल्या बैठकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विजय अग्रवाल यांनी मागच्या बैठकीतील मुद्द्याची नोंद घेऊ नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
त्यावर त्या मुद्द्याची नोंद नाही घेतल्यास लक्षात ठेवा, असा दम सागर भारुका यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यावर विजय अग्रवाल संतप्त झाले. यानंतर सभापती विजय अग्रवाल यांनी भारूका यांना 15 दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्याचे आदेश दिले होते. यामुळे तणाव आणखी वाढला. दरम्यान, भाजपचे गटनेते पवन महल्ले आणि पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांमधील हाणामारीची घटना टळली होती.
बुधवारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील पुन्हा वाद विकोपाला गेला. बुधवारी त्याचाच राग मनात ठेवत शिंदेंसेनेचे गटनेते सागर भारुका आणि पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक मंगेश काळे यांचा महापालिकेत धुडघूस पाहायला मिळाला. भाजप आणि शिवसेनेमधील चिघळलेल्या वादाचा बुधवारच्या दुसरा अंकानंतर भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, या प्रकरणानंतर शिवसेनेचे पदाधिकारी राजेश साळवे, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. विजय अग्रवाल यांच्याविरोधात सागर भारूका यांनी देखील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत खडाजंगी झाल्याने दोन्ही पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आल्याने राजकीय पारा तापला आहे.





