स्वतःहून अत्याचार करून घेणाऱ्या महिलांची नावे आणि व्हिडिओ जाहीर करा; माजी मंत्री सुबोध सावजी यांची वादग्रस्त मागणी

SHARE:

मुंबई – सध्या अंधश्रद्धा आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांवर होणार्या अत्याचाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या दरम्यान राज्यातील एका माजी मंत्र्यांनी वादग्रस्त मागणी केली आहे. स्वतःहून अत्याचार करून घेणाऱ्या महिलांची नावे आणि त्यांचे व्हिडिओ जाहीर करा, अशी धक्कादायक मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी थेट राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र पाठवले आहे.

सावजी यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की बलात्कार दोन प्रकारचे आहेत. एक जबरदस्ती केलेला बलात्कार तर दुसरा महिलेने स्वतःहून करवून घेतलेला बलात्कार. जबरदस्ती केलेला बलात्कार यामध्ये महिलांची नावं गुप्तच राहिली पाहिजेत. हे समाजाकरीता चांगलं आहे, मात्र ज्या महिलांनी स्वार्थाकरीता, पैसे कमविण्याकरीता बलात्कार करुवून घेतले अशा व्यभिचारी महिला समाजाला कलंक आहेत. अशा महिलांना समाजासमोर आणावे. अशा महिला जनतेसमोर उघड झाल्यास इतर महिला अशा वागणार नाहीत. स्वार्थाकरीता, पैशाकरीता बलात्कार करवून घेण्याचे प्रकार कमी होतील, असं सुबोध सावजी म्हणाले.

सावजी यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की भोंदूबाबा, संत, महात्मे किंवा आर्थिक लाभाच्या नादी लागून अनेक महिला ठिकठिकाणी जाऊन असे कृत्य करतात. सध्याच्या कायद्यानुसार पीडितेचे नाव जाहीर करता येत नाही आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई होते. मात्र, ही पद्धत बदलण्याची गरज आहे. अशा महिला जनतेसमोर उघड झाल्यास इतर महिला अशा वागणार नाहीत आणि स्वार्थासाठी होणारे प्रकार कमी होतील.

मात्र ज्या महिला खरातसारख्या भोंदू बाबाकडे जाऊन स्वतःहून बलात्कार करवून घेतात, त्या महिलांवर खटले दाखल करून त्यांची नावे, फोटो आणि व्हिडिओ शासनाने जाहीर करावे, यासाठी आपन शासनाला निर्देश द्यावेत, असे सुबोध सावजी यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

माजी मंत्री सुबोध सावजी यांची ही वादग्रस्त मागणी समोर येताच राज्यात खळबळ उडाली असून त्यांच्यावर चीड आणणारे वक्तव्य म्हणून टीका होत आहे. अत्याचार झालेल्या महिलांना बदनामीची भीती दाखवून त्यांचे शोषण होत असताना, अशाप्रकारचे वक्तव्य पीडित महिलांवर उलट अन्याय करणारे असल्याचे मत व्यक्त केले जात असून त्यांच्या या वादग्रस्त मागणीने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

अधिक वाचा