शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंना तडीपार करा, वंचितच्या कार्यकर्त्यांची मागणी

SHARE:

बुलढाणा – गेल्या काही दिवासांपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि बुलढाणा जिल्हयाचे भाजपाध्यक्ष विजय शिंदे यांच्या चांगलाच शाब्दिक खडाजंगी होत असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामुळे जिल्हयाचे राजकीय वातावरण देखील तापले आहे. या दरम्यान जिल्हयाची बदनामी होत असल्याचा आरोप करत आणि कायदा- सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांना तडीपार करण्यात यावे, अशी मोठी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवासांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिदेंवर गंभीर आरोप केले होते. विजय शिंदे हे बुलढाण्याचे दसरे खरात आहेत, त्यांनी त्यांच्या शाळेतील मुलींचे लैंगिक शोषण करत अनेक मुलींचे आयुष्य बरबाद केले, असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी विजय शिंदे यांच्यावर केला होता.

मात्र विजयराज शिंदे यांनी संजय गायकवाड यांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत. गायकवाड यांनी माझाच नाही तर आदिवासी व मागासवर्गीय महिला व मुलींचा अवमान केला आहे. त्यांनी आदिवासींसह माझीही माफी मागितली पाहिजे. अन्यथा मी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा टाकणार असल्याचे विजय शिंदे म्हणाले होते.

आमदार संजय गायकवाड आणि भाजप जिल्हयाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यातील गंभीर आरोपांमुळं राजमाता जिजाऊंची जन्मभूमी म्हणून ओळखली जाणार्या बुलढाणा जिल्हयाची बदनामी होत आहे. तसेच जिल्ह्यात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांना जिल्हयातून तातडीने तडीपार करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांना दिले. सामान्य गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करणारे प्रशासन, जिल्ह्याची शांतता भंग करणाऱ्या या बड्या नेत्यांवर मेहेरबानी का करत आहे? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. वंचितच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केल्याने जिल्हा प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Comment