अहिल्यानगर – नव्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांची खरी आणि समतोल ओळख पोहचणे अत्यंत गरजेचे आहे, असे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. लोकप्रतिनीधी कसा नसावा यावर गोविंद पानसरेंच्या पुस्तकाची आठवण सांगत सत्यजीत तांबेंनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे.बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. यावरून संजय गायकवाड यांच्यावर राज्यातील विरोधी पक्षांनी ही टीका केली आहे.
राज्यातील पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी देखील या प्रकरणात उडी घेत आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे की, चुकीच्या पद्धतीने आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्ये केली आहेत. राज्यात पुन्हा एकदा शिवाजी कोण होता? या विषयावर चर्चा सुरू करून दिली. त्याच बरोबर राज्यात आमदार, खासदार वा राज्याचा लोकप्रतिनिधी कसा नसावा यावरही चर्चा सुरु झाली आहे. राज्यात या विषयाची चर्चा नव्या पिढीत होणे अत्यंत गरजेचे आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक १९८७ साली प्रकाशित झाले आहे. म्हणजे ३९ वर्षांनंतरही पुस्तक न वाचता हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. आणि त्यातूनच या पुस्तकाचे काय महत्त्व आहे हे पुन्हा राज्यातील जनतेला कळाले आहे. मागच्याच आठवड्यात माझी मुलगी अहिल्याने गप्पा मारताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. बाबा, तुम्ही सांगता ते आणि शाळेत शिकवतात ते शिवाजी महाराज वेगळे का वाटतात? यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील आजच्या नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची खरी आणि समतोल ओळख पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला. आणि २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. नेमके त्याच काळात फेब्रुवारीला शिवजयंती होती, कॉ. गोविंद पानसरेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही नगर शहरात शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या सुमारे १०,००० प्रती वाटून प्रबोधन करण्याचा छोटासा प्रयत्न केला होता. ती आठवण आज पुन्हा ताजी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे करताना बारा बलुतेदार, अठरा पगड जाती आणि सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेत एक समावेशक स्वराज्य उभारले आहे. स्वराज्य म्हणजे एक प्रकारे लोकशाहीवादी विचारच होता. ज्यात राजाने जनतेला लुटून ऐश-आराम करण्यापेक्षा रयतेला केंद्रबिंदू ठेवून राज्यकारभार करणे होय.
आज महाराष्ट्र ज्या उंचीवर उभा आहे, त्यामागे हाच विचार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. म्हणूनच, ही चर्चा केवळ वादासाठी नव्हे, तर योग्य समज, अभ्यास आणि पुढील तरूण पिढीला नवी दिशा देण्यासाठी व्हावी, हीच अपेक्षा, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. आमदार सत्यजीत तांबे पुढे म्हणाले आहेत की, आमदार संजय गायकवाड यांचे फोनवरचे संभाषण ऐकून हसावे की रडावे असे झाले? छत्रपती शिवाजी महाराज यांनी परस्त्रीला आई मानावे हा दंडक घालून दिला होता. शिवाजी महाराज स्वराज्य आणि शत्रूपक्षातील स्त्रियांचाही नेहमी आदर करत असत, त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी वापरलेल्या शब्दांमुळे शिवाजी महाराज अशा आमदार संजय गायकवाड सारख्या लोकप्रतिनिधींना कधीच माफ करणार नाहीत हेही तितकेच खरे आहे, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.






