मुंबई – भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का लागला आहे. सिंधुदुर्ग न्यायालयाने नितेश राणे यांना २०१९ च्या चिखलफेक प्रकरणात दोषी ठरवून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या सोबतच न्यायालयाने राणे यांलर १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. यातील ५० हजार रुपये अभियंत्याला नुकसान भरपाई म्हणून दिले जातील. नितेश राणे यांनी एनएचएआय अभियंत्यावर चिखलफेक करून आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, तसेच लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेऊ नये, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी केली.
न्यायालयाने नितेश राणे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून त्यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वेळ दिला आहे. या प्रकरणातील इतर 29 आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख म्हणाले की नितेश राणे यांचा हेतू उदात्त असला तरी त्यांनी सरकारी कर्मचाऱ्याचा सार्वजनिकरित्या अपमान किंवा अवमान करायला नको होता. अशा परिस्थितीत, सरकारी कर्मचारी सन्मानाने आपली कर्तव्ये पार पाडू शकत नाहीत. अधिकाराचा गैरवापर करून त्या कर्मचाऱ्याचा अपमान करण्यात आला. तक्रारदार एनएचएआयमध्ये उच्च पदावर आहेत हे माहीत असूनही, त्यांच्याशी अनादराने वागण्यात आले, ज्यामुळे त्यांना अपमानित वाटले.
ही घटना ४ जुलै २०१९ रोजी घडली होती. त्यावेळी नितेश राणे काँग्रेसचे आमदार होते आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामावर ते नाराज होते. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा दावा त्यांनी केला रस्त्यांवर पाणी साचण्याच्या समस्येविरोधातही ते आवाज उठवत होते.
नितेश राणे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता प्रकाश शेडेकर यांना चर्चेसाठी बोलावले. दोघांची भेट कणकवलीजवळील एका पुलावर झाली. संभाषणादरम्यान त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि राणे यांनी आपल्या समर्थकांसह प्रकाश यांच्यावर चिखलाचे पाणी फेकले. प्रकाश यांना चिखलातून चालावे लागले. याच्या निषेधार्थ, प्रकाश यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
नितेश राणे आणि इतर २९ जणांवर दंगल, कर्तव्य बजावण्यास अडथळा आणण्यासाठी हल्ला आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. न्यायालयाने नितेश राणे यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४ अंतर्गत दोषी ठरवून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पुराव्याअभावी इतर २९ आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. दंगल केल्याचा किंवा सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा कोणताही पुरावा नसल्यामुळे राणे यांना त्या आरोपांमधून दोषमुक्त करण्यात आले.






