१९ हजार ३०० रूपये काढण्यासाठी मागितला पुरावा; भाऊ बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहचला

SHARE:

झारखंड – एकीकडे सरकारी बँकांना हजारो कोटींचा चुना लावून काही उद्योजक विदेशात पळाले असताना दुसरीकडे १९,३०० रूपयांसाठी बँकेने एका भावाला बहिण जिवंत असल्याचा पुरावा मागितला. त्यामुळे चक्क जमिनीतून बहीणीचा सांगाडा काढून भाऊ बँकेत पाहोचला, ही धक्कादायक घटना झारखंड राज्यातील केंदूझर जिल्हयातील दियानाली गावात घडली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेया घटनेवरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.

दियानाली गावातील रहिवाशी जितू मुंडा याची बहीण काकरा मुंडा यांचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. काकरा मुंडा यांचे ओडिशा ग्रामीण बँकेच्या मल्लापासी शाखेत खाते होते. या खात्यात १९,३०० रुपये जमा होते. काकरा मुंडे याचे पती आणि त्यांच्या एकमेव मुलाचे यापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे जितू मुंडा हाच आपल्या बहिणीचा एकमेव वारसदार उरला होता.
त्यामुळे जितू मुंडा बहिणीच्या निधनानंतर मल्लापासी शाखेत पैसे काढण्यासाठी गेला. मात्र बँकेच्या नियमांचा हवाला देत शाखा व्यवस्थापकाने पैसे देण्यास स्पष्टपणे नकार दिला. खातेदार स्वतः बँकेत प्रत्यक्ष उपस्थित असली पाहिजे किंवा जितू मुंडा यांनी आपण कायदेशीर वारसदार असल्याचे सिद्ध करणारी अधिकृत कागदपत्रे सादर केली पाहिजेत, असे बँकेने सांगितले. यावर जितू मुंडा यांनी बँक अधिकार्यांना सांगितले कि त्यांची बहिण काकरा मुंडा हीचा मृत्यू झाला आहे. पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी काही ऐकलं नाही.

मृत बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी वारंवार चकरा मारूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या जितू मुंडा यांनी टोकाचे पाऊल उचलले. ते गावातील दफनभूमीकडे गेले. त्यांनी आपल्या बहिणीची कबर उकरली आणि बहिणीचा सांगाडा बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी तो सांगाडा एका कापडात गुंडाळला आणि आपल्या खांद्यावर उचलून भर उन्हात ३ किलोमीटर अंतर पायी चालत बँकेत पोहोचला.

या कृत्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासनात खबबळ उडाली. अनेकांना संताप अनावर झाला. त्यांनी बँक प्रशासनाला धारेवर धरलं. बँकेनं गावच्या सरपंचांचं पत्र आणायला सांगायला हवं होतं, जीतू यांच्या घरी जाऊन पडताळणी करायला होती, माणुसकीच्या आधारावर निर्णय घ्यायला हवा होता, एका गरीब माणसाला न्याय मिळवण्यासाठी असं टोक गाठावं लागलं, अशा शब्दांत ग्राहकांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना सुनावलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस बँकेत दाखल झाले. त्यांनी जीतू यांना समजावलं आणि शांत केलं. या प्रकरणात माणसुकीच्या भावनेतून लक्ष घालण्यात येईल, असा शब्द अधिकाऱ्यांनी जीतू मुंडा यांना दिला.

जीतू मुंडा यांनी सांगितले की मी अनेकदा बँकेत गेलो. त्यांनी अनेकदा बहिणीच्या मृत्यूबाबत माहिती दिली होती. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी खातेदाराला सोबत आणायला सांगितल. खातेदाराला प्रत्यक्ष आणल्याशिवाय पैसे देता येणार नाही, असे सांगितले. खातेदार मेला आहे, असे मी त्यांना सांगितले, तरी त्यांनी ऐकले नाही, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जीतू यांनी बहिणीची कबर उकरून सांगाडा बाहेर काढला आणि मृत्यूचा पुरावा म्हणून बँकेत आणला.

या घटनेवर ओडिशाचे महसूल मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की दाना मांझी यांच्या घटनेनंतर ओडिशामधील ही दुसरी अशी घटना आहे. जिल्हाधिकारी या प्रकरणाची चौकशी करत असून, बँक व्यवस्थापकावर त्याच्या वर्तनाबद्दल कठोर कारवाई केली जाईल. दुसरीकडे केंदूझार जिल्हा प्रशासनाने या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करणारे एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे की लोकांच्या हक्कांचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणे हे जिल्हा प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यांना मृत्यू प्रमाणपत्र आणि कायदेशीर वारस प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. भविष्यात कोणत्याही निरपराध व्यक्तीला अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी ते पूर्णपणे कटिबद्ध आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा