मूत्रदाहाचा विकार व आयुर्वेदिक उपचार

SHARE:

● अनेकांना मुत्रदाह विकाराचा त्रास असतो ज्यामुळे लघुशंका करतांना अतिशय त्रास होतो. मूत्रदाह हा विशेषतः लघवी करताना जाणवतो तेव्हा जळजळ होते. हया विकाराचा उद्भव विशेषतः उन्हाळ्यामध्ये होतो. या विकाराचे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर मूत्रविकारांना तोंड द्यावे लागते. आयुर्वेदात मूत्रदाह हा प्रामुख्याने पित्तदोष वाढल्यामुळे उद्भवणारा विकार मानला जातो.

● या विकारांची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, वारंवार लघवी लागणे, लघवीचा रंग पिवळा किंवा गडद होणे, लघवीला दुर्गंधी येणे, खालच्या पोटात वेदना किंवा अस्वस्थता हमखास जाणवते, ताप किंवा अशक्तपणा (इन्फेक्शन असल्यास) सुध्दा जाणवतो.

● मुत्रदाह विकार कशामुळे निर्माण होतो तर त्याची कारणे विविध आहेत. शरीरातील पित्तदोष वाढणे, पाणी कमी पिणे, अतितिखट, आंबट, मसालेदार आहाराचे सेवन करणे, मूत्रमार्गाचा संसर्ग होणे, किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) तयार होणे, जास्त वेळ लघवी रोखून धरणे, स्वच्छतेचा अभाव.

● मधुमेहाचा आजार असेल तर या आजारामुळेही मूत्रदाहाचा विकार उद्भवतो.
मूत्रदाहाची लक्षणे इतर काही विकारांमध्येही दिसू शकतात, त्यामुळे योग्य निदान महत्त्वाचे आहे मूत्रमार्गाचा संसर्ग, मूत्रपिंडातील खडे , प्रोस्टेट ग्रंथीचा विकार (पुरुषांमध्ये), योनिमार्गातील संसर्ग (स्त्रियांमध्ये),

● मूत्रदाहाचा विकार होऊच नये यासाठी काही नियम व पथ्य हे पाळावे लागतात.
मूत्रदाहात योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर असा विकार असणा-यांनी दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी नियमित पिणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास नारळपाणी, ताक, लिंबूपाणी पिणे.
शितल गुणधर्म असलेल्या भाज्या व फळांचे सेवन केले पाहिजे. जसे काकडी, दोडका, परवर, कारले, धने,आवळा, द्राक्षे, डाळिंब खाल्ले पाहीजेत.
● मुत्रदाह विकार असणा-यांनी अतितिखट, मसालेदार, आंबट पदार्थ, तेलकट व फास्ट फूड खाऊ नयेत. मद्यपान, कॅफीनयुक्त पेये घेणे टाळावे, जास्त मीठ न खाता सौम्य प्रमाणात खावे. गरम पदार्थ टाळावेत. वेळेवर लघवी करणे, ती रोखून न ठेवणे, पोहणे शिकावे व नियमित स्विमिंग करावे म्हणजे शरीरातील तापमान संतुलित राहून दाह कमी होतो. दिवसाला दोन ते तीन वेळा आंघोळ करणे. ताणतणाव पासून अलिप्त राहावे. पुरेशी झोप घेणे. हलका व्यायाम व योगाभ्यास करणे.

● आयुर्वेदिक दृष्टिकोन व औषधे –
आयुर्वेदात मूत्रदाह हा “मूत्रकृच्छ्र” या विकारांत समाविष्ट केला जातो. यामध्ये पित्तशामक व मूत्रल औषधांचा वापर केला जातो.

या विकारासाठी उपयुक्त औषधे आहेत जसे गोक्षुर, चंद्रप्रभा वटी, शीतल काढे (उदा. वाळा, चंदन), द्राक्षासव, गोक्षुरादी गुग्गुळ, यवक्षार ही औषधे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

● पंचकर्म उपचार –
मूत्रदाहात पंचकर्म उपचार खूप प्रभावी ठरतात.

विरेचन – पित्तदोष कमी करण्यासाठी, शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्याकरिता अतिशय उपयोगी.

बस्ती चिकित्सा- मूत्रविकारांमध्ये उपयुक्त चिकित्सा.

उत्तर बस्ती- मूत्रमार्गाच्या विकारांमध्ये विशेष उपयोगी चिकित्सा.

शीतल धारा- शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी

द्रोणी चिकित्सा – शरीराचा छातीच्या खालील भाग पाण्यामध्ये/तेलामध्ये बुडवून बसणे.

नाभीपुरण चिकित्सा – नाभीमध्ये चुना, खोबऱ्याचे तेल किंवा औषधी सिद्ध तेल काही वेळपर्यंत धरणे.

मूत्रदाह हा साधा वाटणारा पण गंभीर होऊ शकणारा विकार आहे. योग्य वेळी निदान करून आयुर्वेदिक उपचार, आहार-विहार यांचे पालन केल्यास हा विकार पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. स्वतःहून औषधे न घेता तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

लेखक
● वैद्य पंकज कावरे
गाडगे नगर, अमरावती
– 9823051031
(लेखक 25 वर्षांपासून आयुर्वेद व पंचकर्मंद्वारे रुग्णसेवा करीत आहेत.)

Leave a Comment

अधिक वाचा