क्रांतिकारी प्रीतीलता वादेदार यांना जयंती निमित्य अभिवादन; ‘नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती’ तर्फे जयंती साजरी

SHARE:

अमरावती – नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती यांच्या वतीने महान महिला क्रांतिकारी प्रीतीलता वादेदार यांच्या जयंतीनिमित्त महावीर नगर येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता माल्यार्पण व पुष्पार्पण कार्यक्रम साधेपणाने व उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रीतीलता वादेदार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेत, ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी दिलेल्या शौर्यपूर्ण लढ्याची आठवण करून दिली. त्यांच्या विचारांमधून समानता, स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश मिळतो, असे वक्त्यांनी नमूद केले.

प्रीतीलता वादेदार यांचा जन्म ५ मे १९११ रोजी तत्कालीन पूर्व बंगाल (आताचा बांगलादेश) येथे झाला. त्या लहानपणापासूनच देशभक्तीच्या विचारांनी प्रेरित होत्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि क्रांतिकारी संघटनांशी जोडल्या गेल्या.

१९३२ साली चिटगाव येथील युरोपियन क्लबवर झालेल्या हल्ल्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा हल्ला ब्रिटिशांच्या अन्यायकारक व भेदभावपूर्ण धोरणांविरोधात होता. अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी स्वतःचा बळी देत शत्रूच्या हाती न पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या त्यागामुळे त्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धैर्यशील आणि प्रेरणादायी महिला क्रांतिकारी म्हणून ओळखल्या जातात.

प्रीतीलता वादेदार यांचे जीवनकार्य हे केवळ स्वातंत्र्यलढ्यापुरते मर्यादित नसून सामाजिक न्याय, समता आणि मानवतेच्या मूल्यांना बळ देणारे आहे. आजच्या काळात धर्मनिरपेक्ष विचारांची जपणूक करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष गणेश मुंधरे यांच्यासह प्रियंका मुंधरे, रुपेश वानखडे, रुपाली खोडके, निलु दास, गुंजन दास, अंजली जावरकर, प्रिया साहू, रवीजी पाचकवडे, अनन्य पाचघरे, आराध्या दातीर, रितेश उज्जेनकर, हंसिका चौव्हन, माही वानखडे, प्रज्वल बनसोड, श्लोक जकताप, निकिता निमजे, पूर्वी चीचमलातपुरे, पूर्वी निमजे, सर्वज्ञ पाचकवडे, नेहा घावट, ईश्वरी डगवार, मानवी माहुरे, सनी घावट, स्वरांशी ढेवले, प्रांजली राऊत, जयसेन चौव्हान, इरा खडसे, सक्षम ढेवले, क्षितिज लोंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले.

Leave a Comment

अधिक वाचा