नीट पेपर लीक प्रकरणात पुण्यातून मनीषा हवालदारला अटक; आतापर्यंत सीबीआयने 11 जणांना ठोकल्या बेड्या

SHARE:

पुणे – देशभरात खळबळ उडवून देणार्या नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने 10 जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून कशा प्रकारे नीटचा पेपर लीक करण्याचा कट रचण्यात आला याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे मुख्य केंद्र हे पुणे मानले जात आहे. आता नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने पुण्यातून शुक्रवारी आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असे या महिलेचे नाव असून तिने नीट यूजी परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केले होते. मनीषा हवालदार पुण्यातील प्रसिद्ध शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका आहेत. या प्रकरणात पुण्यातून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नीट परीक्षेसाठी मनीषा हवालदार हीची भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या अत्यंत गोपनीय प्रक्रियेची माहिती आणि प्रश्न थेट तिच्याकडे उपलब्ध होते. एप्रिल 2026 दरम्यान तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न सहआरोपी प्रा. मनीषा मांढरे दिल्याचा गंभीर आरोप आहे. तपासादरम्यान, हवालदार हिने लीक केलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष नीटच्या परीक्षेत आलेले प्रश्न तंतोतंत जुळल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

मुख्याध्यापिका मनीषा हवालदार या येत्या जून महिन्यात शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांच्या सेवेचा अवघा एक महिना शिल्लक असतानाच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक झालेली दुसरी प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्याशी हवालदार यांचे जवळचे संबंध होते. या दोन्ही मनीषा एकमेकींना चांगल्या ओळखत होत्या आणि त्यांच्या गुप्त भेटीगाठीही होत असत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मनीषा हवालदार हिला सीबीआयकडून अटक होताच, विद्या प्रसारिणी सभेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेकडून तिला निलंबित करण्याचे आल्याचे पत्रक काढण्यात आले. आतापर्यंत सीबीआयने अटक केलेल्या तिन्ही महिला आरोपींची नावे मनीषाच असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी ब्यूटीपार्लर चालवणारी मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली. त्यानंतर मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा मांढरे हिला अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी मनीषा हवालदार हिला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी सीबीआयने देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या शोधमोहिमेदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. कागदपत्रे फुटण्याच्या नेटवर्कची व्याप्ती आणि त्यात सामील असलेल्यांची ओळख निश्चित करण्यासाठी, या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आणि कागदपत्रांची फॉरेन्सिक तपासणी सध्या सुरू आहे.
सीबीआयने नीट पेपर लीक प्रकरणी आतापर्यंत 11 लोकांना अटक केली आहे. यात महाराष्ट्रातील शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार आणि लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे, आणि शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या मनीषा हवालदार यांचा समावेश आहे. याशिवाय सीबीआयने राजस्थानमधून मंगिलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल आणि हरियाणातील गुरूग्रमामधून यश यादव याला अटक केली आहे. त्याच्यावर बिवाल कुटुंबाला फुटलेल्या प्रश्नपत्रिका पोहोचवणारा मुख्य मध्यस्थ असल्याचा आरोप आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment