जनगणनेच्या कामात टाळाटाळ भोवली; शिक्षकावर गुन्हा दाखल

SHARE:

धाराशिव – जनगणनेसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्राला गैरहजर राहिल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता जनगणनेच्या कामासाठी गैरहजर राहिल्यामुळे धाराशिव जिल्हयातील एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबासाहेब ढगे असे या शिक्षकाचे नाव असून ते भूम येथील गुरुदेव दत्त हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत.

राज्यात काही भागात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून काही भागात जनगणनेसाठी प्रशिक्षण सत्र सुरू आहेत. आता प्रशिक्षण सत्राला आणि जनगणनेच्या कामासाठी गैरहजर राहणार्या शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहे. पुणे जिल्हयात प्रशिक्षण सत्राला दांडी मारणार्या 7 शिक्षकांविरोधात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता धाराशीव जिल्हयातील भूम येथे देखील जनगणनेच्या कामासाठी गैरहजर राहिल्यामुळे एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आबासाहेब ढगे असे या शिक्षकाचे नाव असून त्यांच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूम नगर परिषदेचे चार्ज जनगणना अधिकारी प्रवीण जाधव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबासाहेब ढगे हे भूम येथील गुरुदेव दत्त हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यांची जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कामाच्या ठिकाण गैरहजर राहिल्याचे दिसून आले.

दुसरीकडे खासगी, खासगी विनाअनुदानित व अल्पसंख्याक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामाची सक्ती केली जाऊ शकत नाही किंवा त्यांना ते काम करण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. खासगी, विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामासाठी सक्तीने नियुक्त करणे विद्याथर्यांच्या नियमित शिक्षणावर गंभीर परिणाम करणारे ठरू शकते, असे सांगत न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकांकडून जारी करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशांना अंतरिम स्थगिती दिली. यामुळे विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.

Leave a Comment