मुंबई – देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देखील आहेत. मंत्रालयाला सर्वात सुरक्षित माणलं जातं. मात्र त्यांचे मंत्रालयच सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळत आाहे. कारण कि मुंबईतील मंत्रालयात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मंत्र्यांच्या केबिनमधून 80,000 रुपये चोरी झाले आहे. या घटनेने मंत्रालय आणि प्रशासनात खळबळ उडाली असून मंत्रालयात व्हीआयपी इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि चोख पोलीस बंदोबस्त असतानाही ही चोरी झाली कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कॅबिनमधून तब्बल 80,000 रूपये चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच कार्यालयात एकच धावपळ उडाली. कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि विविध विभागांना भेट देणार्यांची रात्री उशिरापर्यंत चैकशी करण्यात आली. अनेक व्यक्तींची झडतीही घेण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र हा प्रकार समोर येऊ नये तसेच या चोरीची वाच्यता होऊ नये यासाठी अधिकार्यांकडून गयावया करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली असून मंत्रालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळेच मंत्रालयात आता जोरदार चर्चा सुरू आहे की, हे प्रकरण केवळ चोरी नसून, कॅश एंट्री उघडकीस येण्याच्या भीतीने दडपण्याचा प्रयत्न आहे. जर पैसे कायदेशीर होते, तर तक्रार दाखल करण्यास एवढा संकोच का? आणि जर नियमांचे उल्लंघन झाले असेल तर कोणाला जबाबदार धरले जाईल? असे सवाल विरोधी पक्ष या मुद्द्यावरून उपस्थित करत आहेत.
या घटनेनंतर आता मंत्रालयातील नियमांवरून देखील चर्चा रंगू लागली आहे. नियमांनुसार, मंत्रालयामध्ये 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम घेऊन जाण्याची परवानगी नाही. मग मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये 80 हजार रुपये कसे आले? ही रक्कम तिथे का ठेवण्यात आली होती? याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






