गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकवून व्यावसायिकाला लुटले; ५५ लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन महिलांना अटक

SHARE:

मुंबई – कल्याणमध्ये विविध योजनांमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाची 55 लाखांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून 2 महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. कल्याणमध्ये दोन महिलांनी एका व्यावसायिकाला फसवल्याची घटना समोर आली आहे. या महिला आरोपींची जयश्री पाटील आणि रोमा परदेशी अशी नावे आहेत. या प्रकरणात एका व्यावसायिकाची इंन्शुरन्स काढण्यापासून या दोन महिलांशी औळख झाली होती. या दोन महिलांवर व्यावसाययिकाकडून लाखो रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कल्याणमध्ये एका व्यावसायिकाला लग्नाचे आमिष दाखवत 55 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोन महिलांनी एकत्र मिळून या व्यावसायिकाला प्रेम आणि लग्नाच्या जाळ्यात अडकवले आहे. या महिलांवर मोठा आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. कल्याण शहरातील महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे कल्याण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील एका दुकानाच्या मालकाची ओळख जयश्री पाटील हिने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी या महिलेशी करून दिली होती. रोमा परदेशी एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत काम करते आहे असे सांगून दोन्ही महिलांनी या व्यावसायिकाशी जवळीक वाढवली होती. सुरुवातीला या दोन महिलांनी इंन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली या व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रोमा परदेशी या महिलेने विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली या व्यावसायिकाकडून लाखो रुपये घेतले आहेत.

मात्र, प्रत्यक्षात कोणतीही इंन्शुरन्स पॉलिसी काढण्यात आली नसल्याचे उघडकीस आले आहे. काही दिवसांनी जयश्री पाटीलच्या माध्यमातून रोमा परदेशी या महिलेने संबंधित व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयार असल्याचे सांगितले. व्यावसायिकानेही या नात्यासाठी होकार दिल्यानंतर दोन्ही महिलांनी वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून पैशांची मागणी केली आहे. कधी कौटुंबिक अडचण, कधी गुंतवणूक, तर कधी लग्नाच्या तयारीच्या नावाखाली संबंधित व्यावसायिकाकडून लाखो रूपये उकळले आहेत.

तक्रारदाराच्या माहितीनुसार, या दोन महिलांना आतापर्यंत 55 लाख रुपये दिले आहेत. या प्रकरणात दीर्घकाळ पैसे देऊनही लग्नाबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने या व्यावसायिकाला शंका झाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यावसायिकाने कल्याण शहरातील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात कल्याण पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपी रोमा परदेशी हिला अटक केली होती. नंतर तिला जामीन मिळाला आहे. पोलिसांच्या तपासात तिची मैत्रीण जयश्री पाटील हिचा सहभाग समोर आल्यानंतर कल्याण पोलिसांनी तिला कोल्हापूरमधून अटक केली आहे.

तक्रारदार व्यावसायिकाने आरोपी दोन्ही महिलांकडून आपले पैसे परत मिळवून देण्याची मागणी पोलिसांना केली आहे. लग्नाचे आमिष, इंन्शुरन्स पॉलिसी, विविध गुंतवणुकीच्या योजना दाखवून दोन्ही महिलांनी माझ्यासोबत मोठी आर्थिक फसवणूक केली आहे, असे त्या व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले आहे. आर्थिक फसवणूक केलेली रक्कम वसूल करून मला न्याय मिळावा, अशी भावना त्या व्यावसायिकाने व्यक्त केली आहे. या प्रकरणात अधिक तपास कल्याण पोलीस करत आहेत.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा